उद्याने सुरू करण्याचा विचार नाही

महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी केले स्पष्ट
पुणे – पुण्यात अद्यापही सार्वजनिक ठिकाणे सरसकट सुरू करण्याची परिस्थिती नाही. सध्या, मान्सून सुरू असून करोना सोबतच इतर आजार देखील होण्याची शक्यता असते. तसेच, सर्व उद्यानांमध्ये असलेल्या ओपन जिम्समुळे देखील करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच सध्या तरी उद्याने सुरू करण्याचा कोणताही विचार नाही. पण, मान्सून हंगाम संपल्यानंतर याबाबत विचार करू, असे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितले.
विधानभवन येथून आयोजित ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये विक्रम कुमार यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सवानंतर पुण्याचा पॉझिटिव्हीटी रेट 30 टक्क्यांच्या पुढे गेला होता. परंतु, हा पिक टाईम आता संपुष्टात येत असून, पुणे शहराचा पॉझिटिव्हीटी रेट 26 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांत बेड्सची मागणी आणि नागरिकांकडून येणारे फोन देखील खूप कमी झाले आहेत, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली.
ऑक्सिजन बेडस् वाढविले…
पुण्यात गेल्या 15 दिवसांत एकूण ऑक्सिजन बेड्सच्या संख्येत तब्बल 900 पर्यंत वाढ करण्यात आली असून यात 69 आयसीयू बेड्स वाढविण्यात आले आहे. तसेच येत्या तीन ते चार दिवसात ससून रुग्णालय देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल. पुण्यातील जम्बो हॉस्पिटल दोन दिवसांत पूर्ण 800 बेड्सच्या क्षमतेने सुरू होत असून, रुग्ण वाढतील तसे दाखल करून घेण्यात येईल, असे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.



