Pooja Bhatt : ‘तिचा मृतदेह घ्यायलाही कोणी आलं नव्हतं’; परवीन बाबींबद्दल पूजा भट्टने केला मोठा खुलासा
Pooja Bhatt : मात्र, यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीच्या आयुष्याने अचानक दुःखद वळण घेतलं आणि अखेर २००५ मध्ये परवीन बाबी यांनी जगाचा निरोप घेतला.

Pooja Bhatt : १९७० ते १९८० या काळाला बॅालिवूडचा सुवर्णकाळ (Golden Era) म्हटले जाते. या काळात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत अनेक अभिनेत्रींनी मोठा पडदा गाजवला. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी. या अभिनेत्रीने अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेले अनेक चित्रपट हिट ठरले.
अभिनेत्री परवीन बाबीने आपल्या सौंदर्याने, स्टाइलने आणि दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य केलं. ‘दीवार’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘शान’ आणि ‘नमक हलाल’यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमधून अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनावर नाव कोरलं. मात्र, यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्रीच्या आयुष्याने अचानक दुःखद वळण घेतलं आणि अखेर २००५ मध्ये परवीन बाबी यांनी जगाचा निरोप घेतला.
आता अनेक वर्षांनंतर अभिनेत्री पूजा भट्टने परवीन बाबी यांच्या आयुष्याशी संबंधित काही भावनिक आठवणी आणि धक्कादायक प्रसंग उघड केले आहेत. एका मुलाखतीत पूजा भट्ट यांनी सांगितले की, लहानपणी त्या आपल्या वडिलांसोबत म्हणजेच दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यासोबत परवीन बाबी यांच्या घरी जात असत.
“परवीन बाबी अत्यंत सुंदर आणि प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांनी मला दिलेलं परफ्यूम आजही माझ्या लक्षात आहे. समोरच्या व्यक्तीला काहीतरी देण्याची त्यांची सवय होती,” अशी आठवण परवीन बाबींविषयी सांगताना पूजा भावुक झाली होती.
पुढे बोलताना पूजाने परवीन बाबी यांच्या आयुष्यातील वेदनादायी वास्तव मांडले. “त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप त्रस्त होत्या. लोकांनी त्याकडे केवळ गोंधळ म्हणून पाहिलं, पण प्रत्यक्षात ती एक मोठी शोकांतिका होती.” जेव्हा परवीन बाबी यांनी अमिताभ बच्चन आणि चित्रपटसृष्टीवर गंभीर आरोप केले होते. त्या काळात अभिनेत्री मानसिकदृष्ट्या खचत चालली होती, पण अनेकजण त्या परिस्थितीकडे मनोरंजन म्हणून पाहत होते, असेही पूजाने सांगितले.
अंत्यसंस्कार करायला कोणीही आलं नाही
सर्वात भावनिक प्रसंग सांगताना पूजा म्हणाली की, परवीन बाबी यांच्या निधनानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठीही कोणी पुढे आले नव्हते. त्यावेळी महेश भट्ट यांनी पुढाकार घेत त्यांच्या जुन्या नात्याचा मान राखत अभिनेत्रीवर अंत्यसंस्कार केले. ग्लॅमर, प्रसिद्धी आणि यशाच्या झगमगाटामागे दडलेली एक वेदनादायी कहाणी म्हणून परवीन बाबी यांचे आयुष्य आजही बॉलिवूडमध्ये चर्चिले जाते.





