Indian ships : भारतीय जहाजांसाठी पाकिस्तानच्या बंदरांमध्ये नो एन्ट्री !

इस्लामाबाद – भारतीय जहाजांना पाकिस्तानने आपल्या बंदरांमध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. काल भारताने पाकिस्तानी जहाजांना भारतीय सागरी हद्दीत प्रवेश करू न देण्याचा निर्णय जाहीर केल्याची प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने आज हा निर्णय घेतला आहे.
भारताने काल पाकिस्तानमधून कोणत्याही उत्पादनांची आयात करण्यावर देखील बंदी जाहीर केली आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर आतापर्यंत वेगवेगळे निर्बंध घातले आहेत. त्या शृंखलेचा भाग म्हणून काल नव्याने काही निर्बंध घातले गेले.
या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय ध्वज असलेल्या जहाजांना पाकिस्तानच्या बंदरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच पाकिस्तानची कोणतीही जहाजे भारतीय बंदरांना भेट देणार नाहीत, असे पाकिस्तानच्या सागरी व्यवहार मंत्रालयाने म्हटले आहे.
२०१९ मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यनंतर पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या सर्व उत्पादनांवर २०० टक्के आयात शुल्क आकारण्यात आले होते. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर सर्व उत्पादनांची आयात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच त्रयस्थ देशाच्या माध्यमातून भारतात आयात होणाऱ्या पाकिस्तानी उत्पादनांच्या आयातीवर देखील बंदी घातली गेली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानशी असलेले सर्व व्यापारी संबंध अधिकृतपणे तोडून टाकण्यात आले आहेत. भारताच्या या निर्बंधांचे विपरीत परिणाम पाकिस्तानच्या यापूर्वीच मोडकळीला आलेल्या अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.





