DJ No entry: तळेगावातील गणेशोत्सवात डीजेला नो एंट्री; मोठ्या आवाजाच्या वाद्यांना परवानगी नाही
DJ No entry: शांतता समितीच्या बैठकीत पोलिसांचा इशारा

तळेगाव दाभाडे – गणेशोत्सवात मोठ्या आवाजाची वाद्ये वाजविल्याने वृद्ध, गर्भवती महिला आणि लहान मुलांना त्रास होण्याची शक्यता तिव्र असते. त्यामुळे ध्वनिप्रदूषण करणाऱ्या वाद्यांना परवानगी दिली जाणार नाही, असे पिंपरी-चिंचवड परिमंडळ चारच्या आयुक्त श्वेता खेडकर यांनी स्पष्ट केले.
तळेगाव दाभाडे येथील गणेशोत्सवानिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, सहाय्यक पोलीस उपायुक्त प्रिया डमाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील, वाहतूक विभाग प्रमुख गणेश लोंढे, पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, विद्युत अभियंता निखिल कुंडलवार यांच्यासह पोलीस कर्मचारी, गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी डीजे पूर्णपणे बंद ठेवला जाणार असल्याचे स्पष्ट केले. तळेगाव ही संतांची भूमी असून गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. त्यातून गावाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सव हा समाजाला एकत्र आणणारा सण आहे.
त्यामुळे मंडळांनी समाजप्रबोधन करणारे देखावे सादर करावेत. स्वतःच्या आनंदासाठी इतरांना त्रास होईल, अशा पद्धतीने वाद्ये वाजवू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना पोलीस प्रशासनाकडून परवानगी दिली जाणार नाही, असे खेडकर यांनी सांगितले.
बैठकीत माजी नगराध्यक्ष मीरा फल्ले, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, फ्रेंड्स ऑफ नेचरचे संस्थापक महेश महाजन, प्रवीण मुऱ्हे, दत्तात्रय मुऱ्हे, महेश सोनपावले, केदार भेगडे, विनोद भेगडे यांच्यासह गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. बैठकीचे स्वागत, प्रास्ताविक आणि आभार पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे यांनी मानले. तर सुत्रसंचलन लक्ष्मण शेलार यांनी केले.
विसर्जन मिरवणुकीबाबत नियोजन
नगराध्यक्ष संतोष दाभाडे यांनी तळेगावातील मानाचा पहिला गणपती दुपारी तीन वाजता विसर्जनासाठी निघणार असल्याचे सांगितले. गणेशोत्सवाचे पावित्र्य आणि शिस्त कायम राखावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी तळेगाव रेल्वे स्थानक परिसरात ध्वनिप्रदूषण होणार नाही, याची प्रशासनाकडून काळजी घेतली जाईल, असे सांगितले.
गणेशोत्सवापूर्वी प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजविण्यात येतील, अशी माहिती उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी दिली. गणेश आगमनापासून विसर्जनापर्यंत तसेच मिरवणुकीदरम्यान वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल, असे विद्युत अभियंता निखिल कुंडलवार यांनी सांगितले.





