Pimpri-Chinchwad : कोट्यवधींच्या मजल्यांवर कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर; अपघात झाल्यास जबाबदार कोण?
Pimpri-Chinchwad : नवीन प्रशासकीय इमारतीच्या कामात कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू आहे. परंतु या कामावरील कामगारांच्या सुरक्षेकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
उंचावर सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काही कामगार कोणतेही आवश्यक सुरक्षा साहित्य न वापरता काम करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी मोठ्या प्रमाणावर कामगार कार्यरत आहेत. मात्र, उंच मजल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे सेफ्टी हार्नेस, हेल्मेट, सेफ्टी बेल्ट अथवा इतर आवश्यक वैयक्तिक सुरक्षा साधने नसल्याचे दिसत आहे.
बांधकामाच्या ठिकाणी थोडीशी चूक किंवा तोल गेल्यास जीवघेणा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, याकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. ठेकेदाराच्या करारातील सुरक्षा अटींचे उल्घंन होत असल्याचे समोर आले आहे.
महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी आणि कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पात कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्यक नियमांचे काटेकोर पालन होणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात ठेकेदाराकडून सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे.
विशेष म्हणजे, हे काम महापालिकेच्या देखरेखीखाली सुरू असताना संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्यांकडून कामगारांच्या सुरक्षेची नियमित तपासणी केली जाते का, असाही सवाल उपस्थित झाला आहे.
भविष्यात दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आधीच सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावेत. तसेच, सर्व कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिल्याशिवाय धोकादायक ठिकाणी काम करू देऊ नये, अशी मागणी होत आहे.
सब ठेकेदाराला कंत्राट
चिंचवड, ऑटो क्लस्टर समोरील सात एकर जागेवर पर्यावरणपूरक १३ मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येत आहे. त्यासाठी पहिल्या टप्यात ३१२ कोटी २० लाख ३२ हजार ८३८ रुपये खर्चाचे काम सुरू आहे.
त्यासाठी हैदराबादची के.एम.व्ही. प्रोजेक्ट्स लिमिटेड ही कंपनी याचे बांधकाम करत असून, शहरातील एक बांधकाम व्यावसायिक यासाठी सब ठेकेदार आहे. या ठेकेदाराने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले आहे.
महापालिकेच्या नोटीसला केराची टोपली
इमारतीच्या बांधकामा दरम्यान कर्मचाऱ्यांची सुरक्षा महत्वाची असल्याने महापालिकेच्या वतीने मे. के एम व्ही प्रोजेक्टस लि. या ठेकेदाराला १४ ऑगस्ट रोजी नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये बांधकाम सुरू असताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेविषयी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.
तसेच प्रकल्पस्थळी कामगारांची सुरक्षितता, अपघात प्रतिबंधक उपाययोजना, आवश्यक सुरक्षा साधनांचा वापर, सुरक्षित कार्यपद्धती, बांधखाम यंत्रसामग्री व साहित्याची सुरक्षित हाताळणी व आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची राहिल. मात्र, याकडे संबंधित ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे.
‘यापूर्वी महापालिका प्रशासनाच्या वतीने संबंधित ठेकेदाराला पत्र देण्यात आले आहे. सुरक्षेविषयी सर्व काळजी घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरविण्यास सांगतिले आहे. तसेच त्याशिवाय काम करता येणार नाही असे देखील सांगितले आहे.’- संध्या वाघ, कार्यकारी अभियंता,





