अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही
रोम – अमेरिका आणि इराण दरम्यान सुरू असलेल्या इराणच्या अणू उर्जा कार्यक्रमाबाबतच्या चर्चेची पाचवी फेरी काल रोममध्ये पार पडली. ही चर्चा काही अंशी सकारात्मक होती. मात्र या चर्चेतून अजूनही कोणताही निष्कर्ष निघू शकलेला नाही, असे या चर्चेसाठी मध्यस्थी करणाऱ्या ओमानच्या मध्यस्थांनी म्हटले आहे.
अजूनही ठोस निष्कर्ष न निघाल्यामुळे या चर्चेपुढील आव्हाने अजूनही कायम आहेत. उर्वरित मुद्द्यांवर आगामी काही दिवसात स्पष्ट मते मांडली जाणे बाकी आहे. दोन्ही बाजूंना मान्य होईल असा तोडगा काढण्यासाठी ही चर्चा पुढे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र अल- बुसेनी यांनी म्हटले आहे.
ही चर्चा अत्यंत गुंतागुंतीची आहे. केवळ एक किंवा दोन बैठकांमधून त्यावर स्पष्ट तोडगा काढला जाऊ शकणार नाही, असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे. या चर्चेचा अपेक्षित निष्कर्ष अद्याप काढला गेला नाही.
मात्र आम्ही अजून निराश झालेलो नाही, असेही अराघची यांनी इराणमधील सरकारी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. चर्चेमध्ये अमेरिकेच्यावतीने सहभागी होणारे स्टीव्ह विटकॉफ आणि मायकेल ऍन्टन यांनी या पाचव्या फेरीसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.





