प्रभात वृत्तसेवा पुणे – आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ११ ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.या परीक्षेच्या माध्यमातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शिक्षणासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमाह एक हजार रुपये याप्रमाणे वार्षिक १२ हजार रुपये दिले जातात. नववीमध्ये प्रवेश घेतल्यावर ही शिष्यवृत्ती सुरू होते आणि विद्यार्थी दहावी, अकरावी आणि बारावीमध्ये नियमितपणे उत्तीर्ण झाल्यास पुढील तीन वर्षासाठी ती शिष्यवृत्ती सुरू राहते. यासाठी विद्यार्थ्याने दहावीत ६० टक्के आणि अकरावीत ५५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.विलंब शुल्कासह १२ ते २१ ऑक्टोबर आणि अतिविलंब २२ ते ३० ऑक्टोबरदरम्यान विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार आहेत. ही परीक्षा २१ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. परीक्षेचा निकाल फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर होईल. केंद्रीय विद्यालये, जवाहर नवोदय विद्यालये आणि खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. परंतु, ते या शिष्यवृत्तीसाठी पात्र नसतात. पालकांचे वार्षिक उत्पन्न ३.५ लाखांपेक्षा कमी असले पाहिजे.