नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी देणारा निनावी कॉल आल्याने रविवारी सकाळी सुरक्षायंत्रणांची धावपळ उडाली. संबंधित फोन आल्यानंतर गडकरी यांच्या दोन्ही निवासस्थानांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, संबंधित धमकी केवळ फेक कॉल असल्याची बाब पोलीस अधिका-यांनी स्पष्ट केली आहे. तसेच या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. विष्णू राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो एका देशी दारूच्या दुकानात काम करतो. याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन गडकरी मागील काही वर्षांपासून वर्धा मार्गावरील जयप्रकाशनगर मेट्रो स्थानक चौकातील एन्रिको हाईट्स येथे राहतात. तर त्यांचे जुने घर महाल येथे आहे. तेथे नवीन घर बांधण्याचे काम सुरू आहे. रविवारी डायल ११२ वर अज्ञात व्यक्तीने फोन करून गडकरी यांचे घर बॉम्बने उडविण्याची धमकी दिली. याची माहिती नागपूर पोलिस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने राणाप्रतापनगर व कोतवाली पोलीस ठाण्याच्या अधिका-यांना कळविण्यात आले. मात्र, तपासणी वेळी काहीही संशयास्पद आढळले नाही. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांनी ज्या मोबाईल नंबरवरून कॉल करण्यात आला होता तो मोबाईल नंबर ट्रेस केला. नागपूर शहरातील सक्करदरा भागातील विमा दवाखानाजवळील तुलसी बाग रोडवरील रहिवासी उमेश राऊत याचा तो नंबर असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी राऊतला विमा दवाखानाच्या आवारातून ताब्यात घेत चौकशीनंतर अटकेची कारवाई केली. तसेच धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता याचा तपास पोलीस करत आहेत.