Nitin Gadkari: “ना उजवे, ना डावे; फक्त संधिसाधू!” नितीन गडकरींचा राजकीय संस्कृतीवर रोखठोक टोला
Nitin Gadkari: विचार भिन्न असला तरी चालेल, पण विचारांशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुण्यात रोखठोक विधान.

Nitin Gadkari – आज विचारभिन्नतेचा प्रश्न नाही, विचारशून्यतेचा प्रश्न आहे. एखाद्याचा विचार आपल्याला पटला नाही, तरी तो आपल्या विचारांशी प्रामाणिक असेल, तर त्याचा सन्मान केला पाहिजे. मात्र, आज ना उजवे, ना डावे; आम्ही संधिसाधू ही प्रवृत्ती वाढत आहे. कौतुक किंवा टीकेची चिंता न करता आपल्याला योग्य वाटते, ते परखडपणे मांडणे महत्त्वाचे आहे, असे मत केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी व्यक्त केले.
पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि श्रमिक पत्रकार संघ यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार एस. के. कुलकर्णी यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल गडकरी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी महापौर मंजुषा नागपुरे, पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके, प्रतिष्ठानचे कार्यवाह पांडुरंग सांडभोर, संघाचे सरचिटणीस हिरा सरवदे आदी उपस्थित होते. पत्रकारितेसह समाजाच्या सर्वच क्षेत्रांत विचारांशी प्रामाणिक आणि मूल्यांशी कटिबद्ध राहणाऱ्यांची संख्या कमी होत आहे.
अशा परिस्थितीत विचारांशी प्रामाणिक राहून समाजप्रबोधन, समाजशिक्षणाचे काम करणारे लोक कमीच आहेत, असे सांगून कठीण विषयांचा सखोल अभ्यास करून त्याची योग्य बाजू समाजासमोर मांडण्याचे काम कुलकर्णी यांनी केले, असे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले. आज तंत्रज्ञानामुळे काही क्षणांत बातमी आणि छायाचित्रे मिळतात. त्यामुळे पत्रकारितेला आता वेगळे आकर्षण आणि नावीन्य देण्याची गरज आहे. पत्रकारांच्या लिखाणाची भाषा बिघडली, तर लोकांची भाषा बिघडेल. लोकशिक्षण हे वर्तमानपत्राचे कर्तव्य आहे, असे महापौर नागपुरे म्हणाल्या.





