bihar politics : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे चिरंजीव निशांत कुमार यांनी जनता दल युनायटेड (JDU) मध्ये अधिकृतपणे प्रवेश केला आहे. पटना येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी “निशांत हैं तो निश्चिंत हैं”, “जय नितीश, जय निशांत” अशा घोषणा देत जोरदार स्वागत केले. JDU चे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष संजय कुमार झा, केंद्रीय मंत्री ललन सिंह आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित होते, मात्र नितीश कुमार स्वतः या कार्यक्रमात हजर नव्हते. पक्षप्रवेशानंतर निशांत कुमार म्हणाले, “मी सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो मी नक्की सार्थ करेन. मागील २० वर्षांत माझ्या वडिलांनी जे काम केले आहे, त्याचा बिहारला अभिमान आहे. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला मजबूत करेन.” त्यांनी पित्याच्या राज्यसभा निवडणुकीच्या निर्णयाचे स्वागत करत त्यांच्या कामगिरीवर गर्व व्यक्त केला. कोण आहेत निशांत कुमार? निशांत कुमार हे सुशिक्षित आणि इंजिनीअर आहेत. त्यांनी रांची येथील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (BIT) मधून सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली आहे. गेल्या काही काळापासून ते राजकारणात येण्याच्या चर्चेत होते. जून २०२५ मध्ये JDU चे सरचिटणीस परम हंस कुमार यांनी त्यांना पक्ष आणि राज्याच्या भल्यासाठी पुढे येण्याचा सल्ला दिला होता. ते शांत आणि दूरदर्शी नेते ठरू शकतात, असे मत व्यक्त केले होते. नुकतेच JDU आमदार हरिनारायण सिंह यांनी दावा केला की, नितीश कुमार १० एप्रिलनंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील. एप्रिलमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या (MLC) निवडणुकीतून निशांत कुमार आमदार होतील. नितीश कुमार यांनी नुकतेच राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षातील एका जवळच्या सहकाऱ्याने आणि आमदार हरिनारायण सिंह यांनी सांगितले की, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन सरकारमध्ये निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती होईल. हा निर्णय सर्वांच्या संमतीने घेण्यात आला असून, निशांत यांना विधान परिषदेवर निवडून आणण्याची योजना आहे.