मोठी घडामोड..! राज्याला नवा मुख्यमंत्री मिळणार; आमदार-खासदारांच्या बैठकांचा धडाका
Politics News

Politics News : राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पुढील राजकीय निर्णयांमुळे सत्तेत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, त्यांचा मुलगा निशांत कुमार लवकरच सक्रिय राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा जोर धरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निशांत कुमार यांनी संजय झा यांच्या निवासस्थानी भेट देत पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली. या ठिकाणी जनता दल (युनायटेड)च्या अनेक महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत. बैठकीला पक्षाचे आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित होते.
सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी दुपारपर्यंत निशांत कुमार औपचारिकरित्या पक्षात प्रवेश करू शकतात. संजय झा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्री श्रवण कुमार, आमदार संजय गांधी, चेतन आनंद, कोमल सिंह, समृद्ध वर्मा आणि ललन सराफ यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
नितीश राज्यसभेत, निशांत राज्याच्या राजकारणात?
दरम्यान, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला आहे. शुक्रवारी झालेल्या जेडीयूच्या बैठकीत निशांत कुमार यांना सक्रिय राजकारणात आणण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवेशावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.
नितीश कुमार राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्ष कडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचवेळी निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे.
मात्र या सर्व घडामोडींवर अद्याप पक्षाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे बिहारच्या राजकारणात पुढील काही दिवसांत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





