CM Resignation News : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपुष्टात येण्याची शक्यता असून बिहारमध्ये नव्या नेतृत्वाबाबत चर्चांना उधाण आले आहे. जेडीयूचे अध्यक्ष असलेले नितीश कुमार हे गेल्या अनेक वर्षांपासून बिहारच्या राजकारणातील प्रमुख चेहरा राहिले आहेत. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे “नितीश पर्व” संपत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. राजीनाम्यानंतर आता पुढील मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून जेडीयूमधील वरिष्ठ नेते आणि सहयोगी पक्षांमध्ये सल्लामसलत सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, नितीश कुमार यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांची भूमिका वाढवण्याचा विचार सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. या सर्व घडामोडींमुळे बिहारच्या राजकारणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसत असून, पुढील काही दिवसांत सत्ता समीकरणे कशी बदलतात याकडे देशाचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपदाचा उत्तराधिकारी कोण? नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्याचे संकेत दिल्याने आता बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण, याची उत्सुकता वाढली आहे. सध्या भाजप बिहारमधील सर्वात मोठा पक्ष असल्याने मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये चर्चेत असलेले काही प्रमुख नावे पुढीलप्रमाणे. सम्राट चौधरी हे सध्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, नित्यानंद राय केंद्रीय गृहराज्यमंत्री, दिलीप जयस्वाल बिहारमधील भाजपचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख आहे. केंद्रात कोणती जबाबदारी मिळणार? नितीश कुमार हे एनडीए (NDA) मधील एक अत्यंत अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना दिल्लीत पाचारण करण्यामागे भाजपची मोठी रणनीती असल्याचे बोलले जात आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना कृषी, रेल्वे किंवा इतर महत्त्वाचे खाते मिळण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध xzसमन्वय साधण्यासाठी त्यांना ‘एनडीए निमंत्रक’ (NDA Convenor) सारखी मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.