Pune District| मुलीची छेड काढणार्यावर निर्भया पथकाची कारवाई

पिरंगुट, -पिरंगुट येथे एका अल्पवयीन मुलीच्या त्रास देणार्या आरोपीला अटक करण्यात आली. पौड पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाने ही कामगिरी केली. अर्जुन दिगंबर जाधव (वय 19, रा. पिरंगुट) याला अटक केली आहे. पॉस्को अंर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरंगुट येथील एका विद्यालयात दहावीत शिकणार्या मुलीला एक मुलगा त्रास देत होता. तसेच त्याने मुलीचा हात धरून माझे तुझ्यावर प्रेम असून तू माझ्याशी बोलली नाही तर तुला ठार मारेन. तसेच घरच्यांना देखील ठार मारण्याची धमकी दिली.
मुलीने ही घटना निर्भया पथकामधील महिला पोलीस कर्मचारी अनिता रवळेकर यांना संपर्क करून सांगितली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस अनिता रवळेकर व पोलिस हवालदार सिद्धेश पाटील यांनी मुलीची शाळेत जाऊन भेट घेतली. तपास करत आरोपीला अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री जाधव करीत आहेत.
तालुक्यात अशा काही घटना कुठे घडत असतील तर मुलींनी व महिलांनी तात्काळ पौड पोलिसांना कळवावे. तसेच निर्भया पथकातील अनिता रवळेकर (91305 41026) किंवा 112 या नंबर वर तातडीने संपर्क करावा, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी केले आहे.





