Nira News | रोहित्र चोरांमुळे पिण्याचे पाणी बंद ; ग्रामपंचायती आणि शेतकरी हैराण

प्रभात वृत्तसेवा
नीरा – पुरंदर तालुक्याच्या दक्षिण पूर्व भागात नीरा नदी व डाव्या कालव्याच्या पट्ट्यात विद्युत रोहित्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे पाणी असून ग्रामपंचायतींना ग्रामस्थांना पिण्याचे पाणी देता येत नसल्याने ग्रामपंचायत प्रशासन त्रस्त झाले आहे. मागील पाच महिन्यांत 25 विद्युत रोहित्रांची चोरी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे गुळूंचे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अक्षय निगडे यांनी या चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे या चोरांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीचे पत्र दिले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून नीरा नदी पट्ट्यातील नीरा, मांडकी, जेऊर, पिंपरे सह परिसरातील राख, गुळुंचे, कर्नलवाडी, थोपटेवाडी, पिसुर्टी आदी गावांमधून रोहित्रांची चोरी सातत्याने होत आहे.
अनेक गावांतील निर्मनुष्य भागातील तसेच नदीकाठचा भाग, गावापासून दूर असलेल्या वस्ती परिसरातील विद्युत रोहित्र चोर्यांचे प्रमाण वाढले आहे. या चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे केल्यानंतरही मागील चार महिन्यांपासून हे रोहित्र चोर सापडत नाहीत व त्यांच्यावर कारवाई होतं नसल्याने विद्युत ट्रान्सफॉर्मरच्या चोर्यांचे खवले आहे त्यामुळे चोरीचे सत्र थांबत नसल्याने सरकारचे व शेतकर्यांचे नुकसान होतं आहे.
या चोरांवर कडक कारवाईचे आदेश द्यावेत असे लेखी पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय निगडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.याबाबत जेजुरी पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र पोलिस प्रशासनलास अद्याप या चोरांचा शोध लागला नाही हे विशेष.
चोरीचे तांबे विक्रेते आणि मोड घेणारे पोलिस खात्यास माहीत नाही का? अशी चर्चा नागरिक आपसांत करीत आहेत. सगळ्याच तक्रारी पोलिस ठाण्यात होत नाहीत. तसेच यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते. गावांच्या पाणीपुरवठ्यावर ही याचा परिणाम होत आहे.
तांबे 700 रुपये किलो..
चोर बाजारातील तांबे धातूचा भाव सुमारे 600 ते 700 रुपये प्रतिकिलो असल्याने रोहित्र चोरीचे प्रमाण वाढले आहे. एका विद्युत रोहित्रामध्ये सुमारे 100 ते 120 किलो तांबे असते. त्यामुळे एका विद्युत रोहित्र विक्रीतून सुमारे 70 ते 80 हजार रुपये मिळतात. काही वेळा ऑईलची देखील विक्री केली जाते.
एक रोहित पुन्हा बसवण्यासाठी सरकारला दीड ते दोन लाख रुपये खर्च येतो त्यामुळे वीज वितरण मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे मागील काही दिवसात वीज वितरणला जवळपास 50 लाखाचा तोटा सहन करावा लागला आहे.
वीज कर्मचार्यांचे या चोरांना सहकार्य?
रोहित्र चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. या चोरीच्या घटनांमध्ये वीज वितरणच्या कर्मचार्यांचे या चोरांना सहकार्य तर नाही ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. उच्च दाबाच्या वीज वाहिन्यांचा संपर्क तोडून रोहित्री खांबावरून सहज खाली पाडली जाते. एकाच ठिकाणची रोहित्री सतत चोरली जाते हे ही विशेष.
“गेल्या पाच महिन्यात सुमारे 25 विद्युत रोहित्र चोरीस गेले आहेत. नदीकाठ आणि दुर्गम भागात विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण अधिक आहे. नागरी भागाशिवाय चोरी होणार्या विद्युत रोहित्राच्या जागी नवीन रोहित्र बसविण्यास दहा दिवसांचा कालावधी लागतो. नव्याने रोहित्री बसवताना वीज वितरण कंपनीने त्यांना वेल्डिंग केले होते. त्याही रोहित्री खांबावरुन पाडून त्यातील ऑईल व तांब्याची चोरी झाली.”
-आनंद पवार, उपकार्यकारी अभियंता
“रोहित्र चोरट्यांना जोपर्यंत कडक शासन होणार नाही, तोपर्यंत या रोहित्र चोरीच्या घटना होतच राहणार आहेत. सापडलेल्या अशा टोळ्यांवर शासनाने मकोका कारवाई करावी. या चोरांमुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान होत आहे. वीज वितरण कंपनीचे अधिकारी रोहित्र बदलून देत आहेत. मात्र चोरीच्या घटनांही पुन्हा पुन्हा होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी गस्त वाढवून रोहित्र चोर पकडावे व शेतकर्यांचे होणारे नुकसान टाळावे.”
-स्वप्नाली विराज निगडे, उपसरपंच कर्नलवाडी





