पुणे जिल्हा | पुरंदरच्या वर्षभरात सहकारी तत्वावर कारखाना सुरू – आमदार संजय जगताप

नीरा, (वार्ताहर)- पुरंदर तालुक्यामध्ये उसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पुरंदरच्या शेतकऱ्यांच्या स्वतःचा असा साखर कारखाना आगामी काळात सुरू करणार असल्याची घोषणा आमदार संजय जगताप यांनी केली. शेतकऱ्याच्या शेतातील ऊस वेळेवर तोडला जाणे महत्त्वाचा आहे. त्यासाठी पुरंदरला आता ऊस कारखान्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पिंपरे खुर्द (ता. पुरंदर) येथे आमदार संजय जगताप यांची रविवारी (दि.११) पेढे तुला करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पिंपरे खुर्द येथील काँग्रेस कार्यकर्ते गोविंद थोपटे आणि अमर थोपटे या दोन कार्यकर्त्यांनी संजय जगताप यांच्यासाठी येथील भैरवनाथाला नवस केला होता. हा नवस फेडण्यासाठी ही पेढे तुला करण्यात आली.
यावेळी आमदार जगताप यांनी पुरंदर तालुक्यात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतला. त्याचबरोबर विरोधकांचाही समाचार घेतला. विरोधकांनी सध्या लोकांना चुकीची माहिती पुरवण्याचा धंदा सुरू केला आहे. सरकारमध्ये त्यांचे ऐकणारे लोक असल्याने सध्या पुरंदरमधील विविध कामांमध्ये अडकाठी आणून लोकांची अडवणूक करण्याचे काम माजी मंत्र्यांकडून सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
पुरंदर उपसा सिंचन योजनेत शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचे देखील त्यांनी म्हटले. माजी मंत्र्यांकडे आता कार्यकर्तेच राहिले नाहीत. त्यामुळे प्रशासनातील अधिकारच त्यांनी कामाला लागल्याचे म्हणत शिवतरे यांना टोला लगावला. पिंपरे येथील मंदिराला फरशी बसवणे असेल किंवा अंतर्गत रस्त्याची कामे, पाणी पुरवठा योजना व इतर कामे आपल्या कार्यकाळात मार्गी लावली आहेत. पिंपरे येथील विकास सेवा सोसायटीसाठी लवकरच स्वतंत्र इमारत उभी करण्याच आश्वासन त्यांनी दिले.
याप्रसंगी पिंपरे गावाचे सरपंच राजेंद्र गायकवाड, उपसरपंच नंदा गायकवाड, काँग्रेसचे नंदुकाका जगताप, सुनीता कोलते, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, ज्ञानेश्वर जाधव, संतोष गायकवाड, बाळू गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विजया गायकवाड, सुरेखा दगडे, महेश गायकवाड, साहेबराव शिंदे,
सुलोचना गायकवाड, संभाजी थोपटे, मीनाक्षी जाधव, बाबा दगडे, भाऊसाहेब गायकवाड, माजी उपसरपंच राजेंद्र गायकवाड, गोविंद थोपटे, सोसायटीचे चेअरमन शंकर गायकवाड, मारुती गायकवाड, कांताभाऊ राखपासरे, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते, अमर गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी केले. सूरज गायकवाड यांनी आभार मानले.
त्यांना जमलं नाही ते आम्हाला नाव ठेवतात?
माजी मंत्री विजय शिवतरे हे जलसंपदा खात्याचे मंत्री असताना त्यांना गुंजवणी पाणीपुरवठा योजना करता आली नाही. चुकीच्या पद्धतीने या योजनेचा आराखडा करण्यात आला. ज्याच्यातून लोकांना फायदा होणार नाही. मात्र ठेकेदाराला मोठा फायदा होईल.
अशी ही योजना तयार करण्यात आली. ती लोकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, ही चुकीची योजना केली जाणार नाही. पुरंदरचे विमानतळ आणि गुंजवणीची पाणीपुरवठा योजना या योग्य ठिकाणीच केल्या जातील. त्यामुळे झालं नाही केलं नाही असं म्हणून कोणीही फिरलं तरी लोकांना सगळं कळत आहे. त्यांना त्या खात्याचे मंत्री असताना जे काम पूर्ण करता आलं नाही. त्याबद्दल त्यांनी आम्हाला शिकवू नये. असे जगताप यांनी माजी मंत्री विजय शिवतरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.





