GBS Case : नीरा परिसरात ‘जीबीएस’ची दहशत! एकाचा मृत्यू, तर एका महिलेची मृत्यूला हुलकावणी; आरोग्य विभाग अलर्ट मोडवर
GBS Case : नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ तास आपत्कालीन कक्ष सज्ज; १९ खासगी दवाखान्यांवर प्रशासनाची करडी नजर.

GBS Case – नीरा परिसरात गिलियन-बारे सिंड्रोम या आजाराच्या संशयित रुग्णांमुळे खळबळ उडाली आहे. उपचारादरम्यान 50 वर्षीय मन्सूर सय्यद यांचा मृत्यू झाला असून 46 वर्षीय कस्तुरी पटेल या महिला रुग्णाने वेळेत उपचार घेतल्यामुळे पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याची दिलासादायक माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
मृत मन्सूर सय्यद यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. जीबीएसच्या लक्षणांबरोबरच इतर व्याधींची गुंतागुंत वाढल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला व उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, कस्तुरी पटेल यांचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान होऊन तातडीने उपचार केल्याने त्या ठणठणीत बर्या झाल्या. या घटनेतून वेळेत उपचार मिळणे किती महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित झाले आहे.
जीबीएस हा मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार असून तो थेट संसर्गजन्य नसल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. मात्र दूषित पाणी किंवा अन्नातून होणार्या संसर्गामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूंवर परिणाम करू शकते. त्यामुळे प्रशासनाने पाणी स्रोतांची तपासणी, सॅनिटरी सर्व्हेलन्स व घरोघरी आरोग्य सर्वेक्षण सुरू केले आहे.
2600 घरांपैकी सुमारे 2000 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे. परिसरातील 19 खाजगी दवाखान्यांवर देखरेख ठेवण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी नीरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन उपाययोजनांचा आढावा घेतला.
त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ, सरपंच तेजस्वी काकडे, दीपक काकडे, स्वप्निल कांबळे, पिंगोरीचे पोलीस पाटील राहुल शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत वाघमारे म्हणाले, नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वेळेत निदान व उपचार झाल्यास जीबीएसवर मात करता येते. प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे.
नीरा येथे 24 तास आपत्कालीन आरोग्य कक्ष कार्यरत असून रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. अफवांना बळी न पडता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भीती नको, पण सतर्कता हवी, अशीच सध्याची परिस्थिती असल्याचे स्पष्ट होत आहे.
“जीबीएस हा संसर्गजन्य नाही. मात्र दूषित पाण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे. हाता-पायांना मुंग्या येणे, अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.”
– डॉ. रामचंद्र हंकारे, डॉ. रामचंद्र हंकारे






