भिंत कोसळून नऊ मुलांचा मृत्यू; चार ते पाच मुले गंभीर जखमी

सागर – मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्याच्या शाहपूर गावात धार्मिक कार्यक्रमादरम्यान भिंत पडल्याने नऊ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याबरोबरीने ४ ते ५ मुले गंभीररित्या जखमी झाली असून त्यांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. रविवारी सकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली.
उद्यापासून (सोमवार) श्रावण महिना सुरु होत आहे. आज रविवार शाळेला सुट्टी असल्यामुळे अनेक लहान मुले शिवलिंग तयार करण्यासाठी मंदिराजवळ जमले होते. उद्या श्रावणी सोमवार असल्याने तंबुव्यवस्था करण्यात आली होती. मुले मंदिराच्या शेजारी असणाऱ्या तंबूमध्ये शिवलिंग तयार करण्यासाठी आली होती.
सातत्याने पडणाऱ्या पावसाने मंदिरालगत असलेली भिंत जीर्ण झाली होती. जोरदार पावसाच्या तडाख्याने ही भिंत कोसळली. भिंतीच्या ढिगाऱ्याखालून मुलांना बाहेर काढण्यासाठी बुलडोझर आणावे लागले, अशी माहिती सागर जिल्ह्याचे जिल्हाधिकारानी दीपक आर्य यांनी सांगितले.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी घटनेनंतर शोक व्यक्त करताना मृत झालेल्या मुलांच्या कुटुंबियांसाठी ४ लाखांची मदत तात्काळ जाहीर केली. त्याबरोबरीने जखमी झालेल्या मुलांसाठी योग्य ते उपचार करण्याचे आदेश देखील प्रशासनाला देण्यात आले आहेत.





