निमगाव केतकी : मागील आठ दिवसांपासून निमगाव केतकी परिसरातील वाड्या-वस्त्यांवर संध्याकाळी ६ ते १० या वेळेत सुरू असलेल्या अघोषित लोडशेडिंगमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या भारनियमानामुळे शेती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, तातडीने तोडगा न निघाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच महावितरणने संध्याकाळच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्यास सुरुवात केली आहे. डासांचा वाढता प्रादुर्भाव आणि उकाड्यामुळे लहान मुलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत, काही बालकांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. अंधारामुळे परिसरात चोऱ्यांची भीती वाढली असून, आगामी निमगाव केतकी यात्रा विचारात घेता ही वेळ बदलण्याची मागणी जोर धरत आहे. या प्रश्नावर ग्रामस्थांनी महावितरणच्या शाखा अभियंत्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. क दत्तात्रय भरणे यांच्याशीही संपर्क साधण्यात आला. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकाऱ्यांशी बोलून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. निवेदन देताना ॲड. सचिन राऊत, कपिल हेगडे, ॲड. सुभाष भोंग, कुलदीप हेगडे, नितीन मिसाळ, संतोष हेगडे, विजय पाटील, राजू भोंग, अमोल जाधव, तुषार खराडे, तानाजी जगताप आदी उपस्थित होते. सध्या वरिष्ठांकडून भारनियमानाबाबत कोणत्याही नवीन सूचना आलेल्या नाहीत. वरिष्ठांकडून आदेश प्राप्त होताच लोडशेडिंगच्या वेळेत बदल करण्यात येईल. – टी. एन. बेरुळे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, निमगाव केतकी. हेही वाचा : Pune District : निमगाव केतकीच्या वाड्याअंधारात; भारनियमनविरोधात ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा