Nilesh Ghaywal Gang: पुणे पोलिसांची मोठी कारवाई! निलेश घायवळ टोळीतील शार्प शुटरसह दोघे गजाआड
Nilesh Ghaywal Gang: फ्लॅटच्या खिडकीतून पळ काढताना आरोपीला पकडले; मिळालेल्या सुगाव्यावरून बालगंधर्व चौकात दुसऱ्या आरोपीला काही तासांतच ठोकल्या बेड्या.

Nilesh Ghaywal Gang – गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या निलेश घायवळ टोळीविरुद्ध दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यात तब्बल वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन पाहिजे आरोपींना कोथरूड पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात संतोष अनंत धुमाळ आणि विपुल उत्तम माझिरे (३०) हे दोघेही अलगद जाळ्यात अडकले.
विशेष म्हणजे, पोलिसांची चाहूल लागताच धुमाळने फ्लॅटच्या खिडकीतून पळ काढण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी त्याला शिताफीने पकडले. त्यानंतर त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे काही तासांतच दुसऱ्या आरोपीलाही बालगंधर्व चौकात जेरबंद करण्यात आले.
कोथरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबार करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी निलेश घायवळ टोळीविरुद्ध दोन स्वतंत्र मोक्का कारवाया करण्यात आल्या होत्या. या गंभीर गुन्ह्यातील संतोष धुमाळ आणि विपुल माझिरे हे दोघेही वर्षभरापासून फरार होते. विपुल माझिरे हा शार्प शुटर म्हणून पोलिसांच्या रेकॉर्डवर आहे
पत्नीला भेटायला आला आणि पोलिसांनी टाकला घेराव
फरार संतोष धुमाळ हा पत्नीला भेटण्यासाठी कोथरूड गावठाणातील गुलमोहर सोसायटीत येणार असल्याची खबर पोलीस हवालदार राजेंद्र लांडगे यांना मिळाली. ही माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीभोवती सापळा रचला. पोलिसांकडून एका फ्लॅटची तपासणी सुरू असताना धुमाळ पोलिसांच्या नजरेस पडला.
त्याने खिडकीतून बाहेर पडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतले. धुमाळची चौकशी केल्यानंतर विपुल माझिरे हा संतोषला भेटण्यासाठी बालगंधर्व चौकात येणार असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांचे पथक तातडीने बालगंधर्व चौकात पोहोचले. पोलिसांनी सापळा रचला. काही वेळातच विपुल तेथे आला असता पोलिसांनी त्याला जागेवरच ताब्यात घेतले.




