Nighotwadi Fire – मंचरजवळील निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथे महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळे भरवस्तीत चार घरांना आग लागल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार, दि. १० रोजी दुपारी घडली. या भीषण आगीत दागिने, संसारोपयोगी वस्तू, धान्य, शालेय साहित्य यांच्यासह सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. दरम्यान महावितरणने ग्रामस्थांनी केलेले आरोप फेटाळले आहे. विशेषतः सुमन दशरथ निघोट यांच्या घरातील दहा तोळे सोने, रोख ३५ हजार रुपये,धान्य, शालेय पुस्तके आणि संसारोपयोगी भांडी सागवानी लाकडाचे छप्पर जळून खाक झाली. त्यांच्या एका कुटुंबाचे सुमारे १३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. तसेच संगीता महादेव चिखले यांचेही घर पूर्णतः जळाले असून सागवानी लाकडाचे छप्पर नष्ट झाल्याने त्यांचे अंदाजे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले. दोन्ही कुटुंबाचा निवारा हिरावला गेला आहे. या आगीत निलेश नंदकुमार निघोट आणि सुभाष कोंडीबा निघोट यांच्या घराचे अंदाजे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीची माहिती मिळताच सरपंच नवनाथ निघोट, निघोटवाडी पतसंस्थेचे अध्यक्ष किसनराव निघोट, स्थानिक ग्रामस्थ व तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. निघोटवाडी (ता.आंबेगाव) : येथे महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळे भरवस्तीत घरांना लागलेल्या आगीत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. मात्र, भयानक आगीतून घरांतील संसारोपयोगी वस्तू वाचवता आल्या नाहीत. मुंबई येथे अग्निशमन दलात काम करणारे ज्ञानेश्वर निघोट हे गावी यात्रेसाठी आले होते. त्यांनी प्रसंगावधान दाखवत तीन गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेत ते किरकोळ भाजले आहे. महावितरणच्या शॉर्ट सर्किटमुळेच ही आग लागल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. याबाबत पाच दिवसापूर्वी व्होल्टेज चढ-उताराची तक्रार फोन व ऑनलाईनद्वारे करण्यात आल्याचे सरपंच नवनाथ निघोट यांनी सांगितले. नुकसानग्रस्त कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत व पुनर्वसन देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. “महावितरणचा सप्लाय बरोबर आहे. मीटरपर्यंत सप्लाय व्यवस्थित असल्याचे दिसून येत आहे. मीटरच्या पुढे अंतर्गत वायरिंगमध्ये काही दोष झाला असेल तर त्याची जबाबदारी महावितरणची नाही. त्यामुळे या झालेल्या दुर्घटनेची तपासणी करण्यासाठी महावितरणचे इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर सोमवारी किंवा मंगळवारी येणार आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत अधिकृत बोलता येईल.” – गफर शेख,सहाय्यक अभियंता मंचर महावितरण. “महावितरणच्या हलगर्जीपणामुळे येथील चार घरांचे शॉर्ट सर्किटमुळे नुकसान झाले आहे. याबाबत महावितरणने तातडीने संबंधित कुटुंबाला आर्थिक मदत करावी. महावितरणकडे याबाबत लेखी तक्रार करण्यात आली असतानाही त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही घटना घडली आहे. याला महावितरणच जबाबदार आहे.अन्यथा निघोटवाडी ग्रामस्थ यापुढील वीज बिल भरणार नाही.” – शिवाजीराव निघोट,सदस्य, आंबेगाव तालुका पंचायत समिती.