Baramati News | वीजचोरीचा ‘स्मार्ट’ प्रयत्न फसला ; TOD मीटरमध्ये छेडछाड करून घेत होते वीज

प्रभात वृत्तसेवा
बारामती – बारामती परिमंडळात महावितरणने बसविलेल्या टीओडी (टाईम ऑफ डे) मीटरमध्ये छेडछाडीची तब्बल 57 प्रकरणे उघडकीस आली असून संबंधित ग्राहकांवर विद्युत कायदा 2003 अंतर्गत वीजचोरीची कारवाई करण्यात आली आहे.महावितरणकडून ग्राहकांना अत्याधुनिक टीओडी मीटर बसविले जातात.
हे मीटर थेट महावितरणच्या नेटवर्क सर्व्हरला जोडलेले असल्याने त्यात छेडछाड झाल्यास किंवा मीटर नादुरुस्त झाल्यास त्याची तत्काळ माहिती (रिअल टाईम डाटा) महावितरणकडे उपलब्ध होते. अशा प्रकारे उघडकीस आलेल्या प्रकरणांची प्रत्यक्ष पडताळणी करून कारवाई करण्यात आली. या कारवाईत बारामती मंडळातील 26, सोलापूर मंडळातील 21 तर सातारा मंडळातील 10 ग्राहकांचा समावेश आहे.
संबंधितांवर विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 व 138 नुसार वीजचोरीची नोंद घेऊन कारवाई सुरू आहे.वीजमीटरमध्ये छेडछाड करणे, वीज वाहिन्यांवर आकोडे टाकणे किंवा अन्य मार्गाने वीजचोरी करणे हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा आहे. यात सहापट दंडासह सहा महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. क्षणिक आर्थिक लाभासाठी वीजचोरीचा मार्ग अवलंबू नये, अन्यथा कठोर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आवाहन महावितरणने केले आहे.





