Iran-US war : इराण-अमेरिका चर्चेची पुढची फेरी इस्लामाबादमध्ये
इराण आणि अमेरिकेतील युद्धबंदीच्या तांत्रिक मुद्द्यांवर चर्चेची पुढची फेरी इस्लामाबादमध्ये होणार आहे. पाकिस्तानमधील माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

Iran-US war – इराण आणि अमेरिकेतील युद्धबंदीच्या तांत्रिक मुद्द्यांवर चर्चेची पुढची फेरी इस्लामाबादमध्ये होणार आहे. पाकिस्तानमधील माध्यमांनी याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
दिनांक १८ जून रोजी शांततेसाठीच्या हंगामी युद्धविरामावर स्वित्झर्लंडमध्ये दोन्ही बाजूंकडून सहमती झाल्यानंतर होर्मूझच्या सामुद्रधुनीवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर आता ही चर्चा पुन्हा सुरू होते आहे, असे एका वर्तमानपत्राने म्हटले आहे.
युद्धबंदीच्या तांत्रिक मुद्द्यांवरील चर्चेसाठी इस्लामाबाद आणि स्वित्झर्लंडमधील बर्जस्टॉक रिसॉर्ट या दोन संभाव्य ठिकाणांचा विचार केला जात होता. त्यापैकी इस्लामाबादची निवड निश्चित केली जाण्याची शक्यता जास्त असल्याचे पाकिस्तानातील एका मुत्सदी अधिकाऱ्याने सांगितले.
मात्र अजूनही या चर्चेचे ठिकाण नक्की कोणते असणार आहे, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. या चर्चेमध्ये इराणचा अणुकार्यक्रम, निर्बंधांमधील सूट आणि परदेशात गोठवलेल्या इराणी मालमत्तेवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे राजकीय सूत्रांनी म्हटले आहे.
तांत्रिक चर्चा ११ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अनेक दिवस चालणाऱ्या शासकीय अंत्यविधींमुळे चर्चा तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. अंत्यविधी संपल्यानंतर तेहरानच्या शिष्टमंडळाची रचना जाहीर केली जाईल, असे इराणी अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे.





