पुढचे पाच दिवस महत्वाचे! पुण्याला पावसाचा येलो अलर्ट जारी; हवामान खात्याकडून नागरिकांना महत्वाचे आवाहन

Pune rain news : गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंती घेतल्यानंतर गुरुवारी रात्री पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील अनेक सकल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना मोठ्या मनस्ताप सहन करावा लागला. तर काही ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता. आता पुढचे पाच दिवस महत्वाचे असून पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवमान विभागाने वर्तवला आहे. तसेच हवामान खात्याकडून नागरिकांना महत्वाचे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक भागांसाठी १३ जून ते १७ जून या काळात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण आहे. यामुळे पुढील काही तासांत पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. घाटमाथ्यावरही जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
गुरुवारी रात्री पुणे शहरातील औंध, बोपोडी, पाषाण, सूस, महाळुंगे, कोथरूड आणि बावधन या भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यामुळे झाडं कोसळली. तसेच अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते.
कोल्हापूरात ढगफुटीसदृश्य पाऊस
गेल्या काही दिवसांपासून विविध भागात पावसाची हजेरी लागत असून कोल्हापूर शहर आणि परिसरात ढगसदृश्य पाऊस आहे. जोरदार वारा आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. वीज पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तळकोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात पवासाचा जोर वाढणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.





