पुणे – भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एकास अटक केली आहे. औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तोतया उपस्थित असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तोतया अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. विनय देव उर्फ वासुदेव निवृत्ती तायडे (54 , रा प्लॉट क्रमांक , रानवारा रो हाऊस, तळेगाव दाभाडे, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या तोतया आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. वासुदेव तायडे याने आपले खरे नाव लपवून डॉ. विनय देव असे नाव लावले होते. आयएएस अधिकारी असून पंतप्रधान कार्यालयात गोपनीय काम करत असल्याची बतावणी त्याने अनेकांकडे केली होती.
औंध परिसरातील सिंध हाऊसिंग सोसायटीत बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन या संस्थेच्या कार्यक्रमात जम्मू काश्मीर येथे मदतीसाठी रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित असलेला डॉ. विनय देव याने आयएएस अधिकारी असल्याचे सांगितले होते.
पंतप्रधान कार्यालयात सचिवपदावर गोपनीय काम करत असल्याचे त्यानी सांगितले होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्याकडे चौकशी केली होती. तेव्हा त्यांना संशय आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला याबाबतची माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी विनय देव नाव सांगणाऱ्या तोतयाचा शोध घेतला. त्याला तळेगाव दाभाडेतील घरातून ताब्यात घेण्यात आले.
ही कामगिरी उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बर सय्यद, सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, अंमलदार राहुल मखरे, निलेश साबळे, इम्रान शेख आणि अभिनव लडकर यांच्या पथकाने केली.