पुणे : मेट्रो पुलाच्या कामावरून खडाजंगी

पुणे – “छत्रपती संभाजी महाराज पुलावरून मेट्रोचा ओव्हरब्रीज जाणार आहे. हे काम गणेश मंडळांना विश्वासात न घेताच सुरू करण्यात येत आहे. याप्रकरणी मुख्यसभेत चर्चा करावी,’ अशी मागणी विरोधी पक्षांनी करत गोंधळ घातला. तर, “हे काम सुरू करण्यास पालकमंत्री अजित पवार यांनीच मान्यता दिली आहे. त्यानंतरही शासनाकडे याबाबत मागणी करायची असल्यास एकत्र बैठक घेऊन निर्णय घेऊ. मात्र, आता चर्चा नको,’ अशी भूमिका महापौर मोहोळ यांच्यासह भाजपने घेतली. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमधे गोंधळ झाला. त्यानंतर अखेर महापौरांनी ही सभा तहकूब केली. यावेळी गणेश मंडळांनीही सभागृहाबाहेर भाजपविरोधात घोषणाबाजी केली.
या पुलाचे काम झाल्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीस अडथळा येणार आहे. त्यामुळे या कामासाठी पर्याय शोधावा, अशी मागणी मंडळांनी केली होती. त्यानुसार, मंडळे तसेच मेट्रोकडूनही काही पर्याय देण्यात आले होते. मात्र, हे पर्याय अव्यवहार्य असल्याचे मेट्रोने कळविले. तसेच पुन्हा उंची वाढवायची असल्यास ते खर्चिक असल्याचे पालिकेस कळवण्यात आले. त्यानंतर मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हे काम पोलीस बंदोबस्तात सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मंगळवारी रात्रीपासून हे काम सुरू होते. त्याचे पडसाद मुख्यसभेत उमटले. याप्रकरणी सभेत चर्चा करावी अशी मागणी मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी तसेच कॉंग्रेसने केली. त्यास सत्ताधाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विरोधकांनी घोषणाबाजी केली.





