नेवासा: आमदार शंकरराव गडाख यांच्या राजकीय गुगलीने विरोधक ‘सैरभैर’

नेवासा (राजेंद्र वाघमारे) – राज्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या राजकारणातील नव्या गुगलीने विरोधक सैरभेर झाल्याचे चित्र राजकीय फडात दिसून येत आहे. गडाखांचा राजकीय निर्णय अद्यापही गुलदस्त्यात असला तरी त्यांच्या बौद्धिक कौशल्यातून विरोधकांना कोणता झेंडा घेवू हाती? असा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. त्यांच्या राजकीय कुरघोडीच्या नव्या फिरकीने विरोधकांना चांगलाच घाम फोडल्याचे चित्र स्वतंत्र नेवासा विधानसभा मतदार संघात दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
शंकरराव गडाख राजकारणातील एक दिग्गज नेते आहेत. ऐनवेळी आपल्या राजकीय कौशल्यातून त्यांच्या राजकीय निर्णयाच्या आधीच विरोधकांची मात्र दाणादान करुन सोडलेली आहे. गडाख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेमुळे विरोधकांना घाम फुटला आहे. विरोधकांनीही आता तुतारी आणि मशालकडे संपर्क साधून ऐनवेळी जर – तरच्या लफड्यात “हम भी किसीसे कम नही” हे दाखवून देण्यासाठी विरोधक आता गाफिल राहिले नाहीत, भाजपाने जर जागा सोडली तर धनुष्यबाण शिंदे सेनेच्या वाट्याला नेवासा मतदार संघात येणार असून सेना – भाजपाच्या निर्णयात आमदार गडाख यांचा पक्ष प्रवेश अडकल्याचा सूर राजकीय रणांगणातून उमटत आहे.
प्रत्यक्षात मात्र गडाखांकडून याबाबत कोणत्याही बाबींना दुजोरा दिला जात नसतांना विरोधक मात्र गॅसवर असल्याचे चित्र मतदार संघात निर्माण झाले आहे. ऐनवेळी गडाखांनी धनुष्यबाण हाती घेतला तर मशाल आणि तुतारीच्या दिशेने विरोधकांनी राजकीय फिल्डिंग लावून राजकीय मैदानात कसरत करणार असल्याचे आता बोलले जात आहे. मात्र आमदार गडाखांच्या राजकीय निर्णयापूर्वीच विरोधकांची दाणादान करण्यात गडाख यशस्वी झाले असले तरी पुढील राजकीय कसरतीतून कशी वाट निघणार? हाच खरा प्रश्न अनुत्तरीत आहे. येणाऱ्या काळातील चित्र काही अवधीतच राजकीय दिशा आणि दशा स्पष्ट करणारा ठरणार आहे.





