राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बंडखोर गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा मोठा गौप्यस्फोट; “53 पैकी 51…”

मुंबई – गेल्यावर्षी महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादीच्या 53 पैकी 51 आमदारांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भाजपबरोबर सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली होती, असा गोैप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बंडखोर गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेसोबत सरकार स्थापन करू शकते, तर भाजपसोबत का नाही, असे प्रफुल्ल पटेल यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पटेल म्हणाले, गेल्या वर्षीच भाजप आघाडीत सामील होण्याच्या विषयावर राष्ट्रवादीत विस्तृत अंतर्गत चर्चा झाली झाली होती. पण निर्णय झाला नाही. आता त्याला आकार देण्यात आला आहे.
हा निर्णय मी किंवा अजित पवार यांनी वैयक्तिकरित्या घेतलेला नसून पक्ष म्हणून घेतला आहे, असे पटेल म्हणाले.भाजपबरोबर सरकार स्थापन करण्याची इच्छा असणाऱ्या आमदारांमध्ये जयंत पाटील यांचाही समावेश होता. केवळ अनिल देशमुख आणि नवाब मलिक या चर्चेत उपस्थित नव्हते, असेही ते म्हणाले. ते म्हणाले, “राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी शरद पवारांना पत्र लिहून सांगितले होते की, पक्षाने सत्तेपासून दूर राहू नये.
असे असेल तर त्याच वेळी सरकारमध्ये सामील होण्याचे पाऊल का उचलले गेले नाही असे विचारले असता पटेल म्हणाले, त्यावेळी कोणताही निर्णय झाला नाही आणि भाजपला त्यावेळी आमची गरज नाही असे पक्षाच्या नेत्यांना वाटले असावे. आपण भाजपबरोबर जाण्याच्या निर्णयाने शरद पवार माझ्यावर नाराज असतील असे वाटत नाही. त्यांच्या माझ्याविषयी ज्या काही भावना असतील त्याला मी सामोरा जाईन, असेही ते म्हणाले.





