Kerala Exit Poll 2026: केरळ विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल ४ मे रोजी जाहीर होणार असले, तरी त्यापूर्वी आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीने राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापवले आहे. विविध संस्थांच्या एक्झिट पोलनुसार, केरळमध्ये यंदा सत्तापरिवर्तनाचे स्पष्ट संकेत मिळत असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ (UDF) सत्ता स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफ (LDF) आघाडीला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून इतिहास रचण्याची आशा होती, मात्र एक्झिट पोलचे कल त्यांच्यासाठी निराशाजनक ठरताना दिसत आहेत. हेही वाचा – पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे धक्कादायक एक्झिट पोल, पहा कोण बनवणार सरकार पाहा एक्झिट पोलचे आकडे – ‘अॅक्सिस माय इंडिया’च्या (Axis My India) एक्झिट पोलनुसार, १४० सदस्यांच्या विधानसभेत यूडीएफला ७८ ते ९० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ७१ जागांच्या आकड्यापेक्षा अधिक आहे. दुसरीकडे, सत्ताधारी एलडीएफ आघाडी ४९ ते ६२ जागांपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला केरळमध्ये अजूनही मोठा प्रभाव पाडता आलेला नसून, त्यांना केवळ ० ते ३ जागा मिळतील असा अंदाज आहे. ‘न्यूज १८-वोटवाईब ट्रॅकर’नेही यूडीएफला ७० ते ८० जागांसह आघाडीवर ठेवले असून एलडीएफला ५८ ते ६८ जागा मिळतील असे म्हटले आहे. हेही वाचा – तामिळनाडूच्या एक्झिट पोलने वेधले देशाचे लक्ष्य; पहा कोण स्थापन करणार सरकार यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा नवा उच्चांक – यंदाच्या निवडणुकीत केरळच्या जनतेने मतदानाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून ७८.२७ टक्के इतके विक्रमी मतदान नोंदवले गेले आहे. २०२१ च्या तुलनेत मतदानाची ही टक्केवारी सुमारे ४ टक्क्यांनी वाढल्याने हा वाढलेला टक्का सत्ताधाऱ्यांविरोधातील रोष आहे की बदलाची लाट, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. राज्यातील २.७१ कोटी मतदारांनी सर्व १४० जागांसाठी एकाच टप्प्यात आपले भवितव्य मतदान यंत्रात बंद केले आहे. मागील निवडणुकीचे आकडे – २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत एलडीएफने ९९ जागांसह दणदणीत विजय मिळवून सत्ता राखली होती, तर यूडीएफला केवळ ४१ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्या निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, यंदाची आकडेवारी पाहता यूडीएफने जोरदार पुनरागमन केल्याचे चित्र दिसते. हेही वाचा – आसाम विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर; सर्वच पक्षांची धाकधूक वाढली जर हे एक्झिट पोलचे आकडे प्रत्यक्ष निकालात परावर्तित झाले, तर केरळमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलण्याची जुनी परंपरा कायम राहील आणि काँग्रेसप्रणित आघाडी पुन्हा एकदा सत्तेच्या चाव्या हाती घेईल. आता सर्वांचे लक्ष ४ मे रोजी होणाऱ्या अधिकृत मतमोजणीकडे लागले आहे.