JDS फुटीच्या उंबरठ्यावर! भाजपशी युतीचा निर्णय अनेकांना अमान्य

बंगळुरू –आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपशी युती करण्याचा निर्णय धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) अनेक नेत्यांना रूचलेला नाही. जेडीएसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष सी.एम.इब्राहिम यांनी तर तो निर्णय थेट शब्दांत अमान्य करत आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. त्यामुळे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएस फुटीच्या उंबरठ्यावर पोहचल्याचे सूचित होत आहे.
भाजपशी युती करून त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडीचा (एनडीए) घटक बनण्याचा निर्णय जेडीएसने 22 सप्टेंबरला जाहीर केला. तेव्हापासून जेडीएसमधील अस्वस्थता वाढीस लागल्याचे वारंवार दिसून आले. अनेक नेत्यांनी त्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली.
केरळ, महाराष्ट्र आणि तामीळनाडूतील काही नेत्यांनी तर तातडीने जेडीएसला रामराम ठोकण्याचे पाऊल उचलले. आता जेडीएसचे खरे प्रभावक्षेत्र असणाऱ्या कर्नाटकात तो पक्ष राजकीय संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष इब्राहिम यांनी घेतलेली भूमिका कारणीभूत ठरली आहे.
इब्राहिम यांनी सोमवारी जेडीएसच्या काही नेत्यांची बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मांडलेली भूमिका जेडीएसमध्ये फूट पडण्याची शक्यता असल्याचे संकेत देणारी ठरली. जेडीएस एनडीएमध्ये सहभागी होणार नाही असा निर्णय आम्ही बैठकीत घेतला.
भाजपशी युती करण्याला मान्यता न देण्याची विनंती आम्ही देवेगौडा यांना करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. देवेगौडा यांनी विनंती मान्य केली नाही तर काय करणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर इब्राहिम उत्तरले, मी जेडीएसचा प्रदेशाध्यक्ष आहे.
कर्नाटकमधील माझ्या पक्षाविषयीचा निर्णय मी घेईन. देवेगौडा यांनी भाजपशी युती करण्याचा निर्णय कायम ठेवल्यास आम्ही त्यासाठी बांधील नसू. जेडीएसचे अनेक आमदार माझ्या संपर्कात आहेत. धर्मनिरपेक्ष असल्याने आमचा गटच खरा जेडीएस आहे, असा दावाही त्यांनी केला.





