सोन्याचा दर विक्रमी पातळीवर; पुढील दिवसांत आणखी वाढणार

मुंबई – विविध देशांदरम्यान युध्द चालू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापार युद्ध भडकविले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने आणि चांदीचा आधार घेत आहेत. यामुळे या आठवड्यात जागतिक बाजारात सोन्याचा दर 3 हजार डॉलर प्रति औंस या विक्रमी पातळीवर गेला.
भारतात फार कमी प्रमाणात सोने तयार होते. अशा परिस्थितीत भारतातील सोन्याचे दर जागतिक सोन्याच्या दराच्या प्रमाणात असतात. यामुळे होळीनंतर भारतात सोन्याचा दर 90 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर जाण्याची जास्त शक्यता असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी भारतात सोन्याचा दर 87,900 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर होता.
जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोने खरेदी करत आहेत. अगोदर काही प्रमाणात डॉलरमध्ये गुंतवणूक होत होती. मात्र आता डॉलरचे अवमूल्यन होत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याचा जास्त प्रमाणात आधार घेत आहेत. भारतात सोन्याचा दर रुपया घसरल्यामुळे वाढत आहे. कारण भारत सोन्याची आयात करतो आणि आयातीला पूर्वीपेक्षा जास्त रुपये मोजावे लागत आहेत.
ट्रम्प यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार जानेवारीच्या अखेरीस हाती घेतल्यानंतर आतापर्यंत सोन्याचा दर 14% तर चांदीचा दर 16 % वाढला आहे. गेल्या 25 वर्षात सोन्याचा दर दहा पटीने वाढला आहे. तर अमेरिकन शेअर बाजाराचे मुख्य निर्देशांक या कालावधीत केवळ चार पटीने वाढले आहेत. औद्योगीक क्षेत्राकडून चांदीची मागणी असते. त्यामुळे चांदीच्या दरातही वाढ होत असून चांदीचा दर सध्या एक लाख रुपये प्रति किलो पेक्षा जास्त पातळीवर आहे.
जागतिक बाजारात अस्थिरता वाढल्यानंतर सोन्याचे दर वाढतात. 2008 पूर्वी सोन्याचा दर 1,000 डॉलर प्रति औंसापेक्षा कमी होता. मात्र 2008 नंतर तो वाढला व 1000 डॉलर प्रति औंस झाला. त्यानंतर करोनाच्या काळात सोन्याने 2 हजार डलर प्रति औंसाचा टप्पा ओलांडला. आता व्यापार युद्धामुळे सोन्याचा दर 3 हजार डॉलर प्रति औंसापेक्षा जास्त झाला आहे.
सोन्याची खरेदी कमी होणार
सध्या सोन्याचा दर जास्त असल्यामुळे दागिन्यासाठी सोन्याची खरेदी मंदावली आहे. ग्राहक दागिने वितरकाकडे जात नाहीत. मात्र ईटीएफ आणि गुंतवणुकीसाठी सोन्याची खरेदी वाढली आहे. महागाईमुळे सोन्याची आयात फेब्रुवारी महिन्यात 85% कमी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सोने जास्त आयात होऊ नये यामुळे सरकारही आता काही उपाययोजना करण्याची शक्यता नाकारता येत नाही.





