“भाजपचे लोक हे विसरले की एकेकाळी पटेलांनी RSSवर बंदी घातली होती, मात्र खुद्द जवाहरलाल नेहरूंनी नंतर हा निर्णय मागे घेतला होता”

मंगळुरू – कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात बजरंग दलावरील बंदीचा उल्लेख करण्याला संघ परिवाराकडून तीव्र विरोध होत असताना, या संघटनेवर बंदी घालण्याचा कोणताही विचार नाही; तसा प्रस्तावही नाही, असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी दिले आहे.
उडुपी येथे पत्रकारांना संबोधित करताना मोईली म्हणाले की, द्वेषाच्या राजकारणाविरोधात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या कठोर निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलासारख्या संघटनांविरुद्ध कारवाईचा उल्लेख केला आहे. मात्र, त्याबाबत पूर्ण माहिती न घेताच काही जणांनी अपप्रचार सुरु केला आहे.
मोईली म्हणाले की, अशा संघटनांवर बंदी घालण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. आता सरदार वल्लभभाई पटेलांची पूजा करणारे भाजपचे लोक हे विसरले आहे की, पटेल यांनी एकेकाळी आरएसएसवर बंदी घातली होती, मात्र खुद्द जवाहरलाल नेहरूंनी नंतर हा निर्णय मागे घेतला होता. द्वेषाच्या राजकारणावर सर्वोच्च न्यायालयाची भूमिका स्पष्ट आहे. हे लक्षात घेऊन आम्ही आमच्या जाहीरनाम्यात त्याचे वर्णन केले होते, परंतु बजरंग दलावर बंदी घालण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.
दरम्यान, मंगळुरू येथे कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी आरोप केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान हनुमानाची एका संघटनेशी तुलना करून भगवान हनुमानाच्या भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. भगवान हनुमानावर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांनी पंतप्रधानांनी माफी मागणे आवश्यक आहे. बजरंग बलीचा अपमान करण्याचा अधिकार पंतप्रधानांना कोणीही दिलेला नाही.
एखादी व्यक्ती किंवा संस्था आणि भगवान हनुमान यांच्यात तुलना केल्याबद्दल मोदींनी कन्नडिगांची माफी मागितली पाहिजे. समाजात फूट पाडणाऱ्या आणि द्वेष पसरवणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांवर कारवाई करण्यासाठी कॉंग्रेस कटिबद्ध आहे, असेही वल्लभ शेवटी म्हणाले.





