मला काही झाले नाही घरी सोडा; करोना संशयित रूग्णाची विनंती

हडपसर – मला काही झालेले नाही…. मी ओके आहे. मला येथे कशाला ठेवण्यात आले आहे हेच समजत नाही. अशा शब्दात करोना संशियत रूग्णांने आपल्या भावना व्यक्त केल्या. पुण्यात सकाळी करोना संशियत रूग्णांची संख्या दोन होती. त्यानंतर संध्याकाळपर्यत हा आकडा वाढत पाच पर्यत पोहचला. त्यात एका कॅब चालकाचा ही समावेश आहे. या कॅब चालकाशी प्रभात प्रतिनिधीने दुरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांने वरील माहिती दिली.
तो म्हणाला, मला आज सकाळी नायडू रूग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर दिवसभर माझ्या तपासण्या करण्यात आल्या. संध्याकाळी मला घरी सोडतील असे वाटले होते पण संध्याकाळी वैद्यकीय अधिकारी आले आणि मला म्हणाले तुम्ही पॉझेटिव्ह आहात त्यामुळे तुम्हाला सोडता येणार नाही.आता मी एकटाच आहे. माझी फॅमिली घरी आहे. आता उद्या सकाळी(बुधवारी) त्यांना सुद्धा बोलविण्यात येणार आहे.
मला काहीच कळत नाहीत काय झाले आहे. मी बरा आहे. व्यवस्थित खातो- पितो आहे. मला कुठलाही आजार नाही ऐवढेच काय तर मी गेल्या पंधरा दिवसात आजारी सुद्धा पडलेलो नाही.असे असताना मला याठिकाणी ठेवले आहे. चानक मला रूग्णालयात आणण्यात आल्याने घरी सुद्धा सगळे टेन्शन मध्ये आहेत. त्याचबरोबर माझी खाण्याची पिण्याची सुद्धा कुठलीही सोय याठिकाणी करण्यात आलेली नाही. सकाळी घरातून नाष्टा केला आहे त्यानंतर मी काहीही खाल्लेले नाही.अशी तक्रार सुद्धा त्याने केली.





