…म्हणून नांदेड रुग्णालयात नवजात बालकांचे मृत्यू, BJP नेत्या चित्रा वाघ यांनी सांगितलं कारण

नांदेड – “छोट्या बाळांना पेटीत ठेवतात. तिथे अनेक आई बसलेल्या होत्या. मी त्यांच्याशी बोलले त्या वेळी त्याचा व्हिडीओ देखील तयार केला. या मातांनी सांगितले की, जेव्हा सरकारच्या वतीने औषधी किंवा गोळ्या दिल्या जातात, पण त्या आम्ही खात नाही.
पोषण आहार दिला जातो, आम्ही कधी खातो, कधी खात नाही. त्यामुळेच बाळांचा मृत्यू झाला,’ असा अजब दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. डॉक्टरांनी ज्या गोळ्या घ्यायला सांगितल्या त्या गोळ्या घेतल्या असत्या तर मुल तंदुरुस्त असते आणि तुमच्या मांडीवर खेळत असते, हे आम्ही त्यांना सांगितल्याचे चित्रा वाघ यांनी यावेळी म्हटले आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात झालेल्या 24 रुग्णांच्या मृत्यूप्रकरणात 12 नवजात बालकांचाही समावेश आहे. या बालमृत्यूवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली.
सध्या राज्यात आरोग्य यंत्रणेतील गोंधळाचीच चर्चा आहे. नांदेड जिल्ह्यातील या मृत्यू प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगानेही घेतली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गरोदर माता सरकारने दिलेल्या गोळ्या घेत नसल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सरकार पुरवू शकतो, गिळायला लावू शकत नाही
सरकार औषधी आणि पोषण आहार पुरवू शकतो, त्यांना गिळायला लावू शकत नाही, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी या घटनेमागील कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.
आशा सेविका लोह आणि इतर गोळ्या देतात. मात्र, गर्भवती माता या गोळ्या घेत नाही, याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज असल्याचे मत चित्रा वाघ यांनी व्यक्त केले आहे.





