BJP Bengal Manifesto 2026: बेरोजगार तरूणांना 3 हजार रुपये भत्ता; महिलांच्या खात्यातही दरमहा 3 हजार, पहा भाजपच्या मोठ्या घोषणा
BJP Bengal Manifesto 2026: एकूणच, BJPने आपल्या संकल्पपत्रातून विकास, सुरक्षा, रोजगार आणि चांगल्या प्रशासनाचे आश्वासन देत बंगालमधील निवडणूक लढत अधिक तीव्र केली आहे.

BJP Bengal Manifesto 2026: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने (BJP) शुक्रवारी (10 एप्रिल 2026) आपले संकल्पपत्र जाहीर केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हे संकल्पपत्र सादर करताना त्याला “विश्वासाचे शपथपत्र” असे नाव दिले. हे दस्तऐवज बंगालच्या जनतेसाठी विश्वास निर्माण करणारे असून, विकासाचा स्पष्ट रोडमॅप देणारे असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित शाह म्हणाले की, या संकल्पपत्रातून बेरोजगार युवक, भीतीच्या वातावरणात जगणाऱ्या महिलांना दिलासा मिळेल आणि राज्याला नव्या दिशेने नेण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “विकसित भारत” संकल्पनेशी सुसंगत असे हे धोरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी BJPने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीका करत, राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप केला.
संकल्पपत्रातील प्रमुख घोषणा – (BJP Bengal Manifesto 2026)
-
- BJPने सत्तेत आल्यास घुसखोरीच्या मुद्द्यावर ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘डिटेक्ट, डिलीट आणि डिपोर्ट’ ही मोहीम राबवली जाईल.
- राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (DA) देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर 45 दिवसांत सातवा वेतन आयोग लागू केला जाईल.
- महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांच्या बँक खात्यात दरमहा 3 हजार रुपये देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील बस प्रवास महिलांसाठी मोफत केला जाईल. 75 लाख महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. गर्भवती महिलांना 21 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.
- बेरोजगार युवकांना नोकरी मिळेपर्यंत दरमहा 3 हजार रुपये भत्ता देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
- आरोग्य क्षेत्रात आयुष्मान भारत योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच सरकार स्थापन झाल्यानंतर 6 महिन्यांत समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या दिशेने काम केले जाईल.
- गाईंच्या तस्करीला आळा घालण्यासाठी राज्याच्या सीमा सील करण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.
Trust defines the new path for West Bengal as a firm commitment exists to implement every promise immediately after the formation of the BJP government. With 15 strong resolutions and one clear goal, the mission remains to build a well-governed, secure, and fear-free West Bengal.… pic.twitter.com/59415SdlRw
— BJP West Bengal (@BJP4Bengal) April 10, 2026
कोलकात्यासाठी विशेष विकास आराखडा – BJP Bengal Manifesto 2026
BJPने कोलकात्याला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मेट्रो नेटवर्कचा विस्तार, पुलांच्या मजबुतीकरणासाठी वेळबद्ध योजना आणि हल्दिया बंदराच्या विकासावर भर दिला जाईल. व्यवसाय सुलभ करण्यासाठी नवीन धोरणे आणली जातील आणि सिंडिकेट प्रणाली समाप्त करण्याचा दावा करण्यात आला आहे.
कृषी आणि उद्योगासाठी उपाययोजना – BJP Bengal Manifesto 2026
- शेतकऱ्यांसाठी विशेष योजना जाहीर करताना बटाटा, तांदूळ आणि आंबा उत्पादकांना मदत केली जाईल, असे सांगण्यात आले. चहा उद्योग मजबूत करण्यासाठी आणि चहा बागांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या जातील.
- उत्तर बंगालच्या विकासासाठी IIT, AIIMS, IIM आणि फॅशन डिझाइनसारख्या संस्थांची उभारणी करण्याची घोषणा करण्यात आली आहे. ‘वंदे मातरम म्युझियम’ आणि ‘वंदे मातरम मिशन’द्वारे बंगालच्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन केले जाईल.
कायद्याच्या अंमलबजावणीवर भर –
कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर BJPने तृणमूल काँग्रेस सरकारच्या कार्यकाळावर श्वेतपत्रिका सादर करण्याचे सांगितले आहे. भ्रष्टाचार, राजकीय हिंसा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केला जाईल.
अमित शाह यांनी दावा केला की, बंगालमध्ये बदलाची भावना वाढत आहे आणि BJPने गेल्या 10 वर्षांत मजबूत विरोधक म्हणून काम केले आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त शासन दिल्याचे उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
एकूणच, BJPने आपल्या संकल्पपत्रातून विकास, सुरक्षा, रोजगार आणि चांगल्या प्रशासनाचे आश्वासन देत बंगालमधील निवडणूक लढत अधिक तीव्र केली आहे.





