Newasa News : डिजिटल जन्म दाखले रखडल्याने विद्यार्थ्यांचे वर्ष धोक्यात; नेवासे नगरपंचायतीसमोर पालक-विद्यार्थ्यांचे उपोषण
गेल्या तीन महिन्यांपासून केवळ एका कागदासाठी सुरू असलेली पायपीट, सरकारी कार्यालयातील (Newasa News) लालफितीचा कारभार आणि त्यामुळे धोक्यात आलेले शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य... अखेर संयमाचा बांध फुटला आणि संतप्त पालकांनी सोमवारी थेट नेवासे नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले.

Newasa News : गेल्या तीन महिन्यांपासून केवळ एका कागदासाठी सुरू असलेली पायपीट, सरकारी कार्यालयातील (Newasa News) लालफितीचा कारभार आणि त्यामुळे धोक्यात आलेले शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य… अखेर संयमाचा बांध फुटला आणि संतप्त पालकांनी सोमवारी थेट नेवासे नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले.
शाळांमध्ये सध्या आगामी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. यंदा शाळा प्रशासनाने (Newasa News) डिजिटल जन्म दाखल्यांची सक्ती केल्यामुळे पालकांची धावपळ उडाली आहे. मात्र, जुने दाखले आणि आवश्यक सर्व कागदपत्रे वेळेत जमा करूनही नेवासे नगरपंचायतीच्या सुस्त कारभारामुळे तब्बल तीन महिने उलटले तरी विद्यार्थ्यांना डिजिटल दाखले मिळालेले नाहीत.
वेळेत दाखला न मिळाल्यास परीक्षेचा फॉर्म भरता येणार नाही आणि विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाईल, या भीतीने पालकांचा जीव टांगणीला लागला आहे. अखेर प्रशासनाला जागे करण्यासाठी भाऊसाहेब वाघ, अनिल ताके-पाटील आणि राहुल देहाडराय यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आणि पालकांनी नगरपंचायतीच्या दारातच उपोषण सुरू केले.
यावेळी उपोषणकर्त्यांनी प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र संताप व्यक्त केला. राहुल देहाडराय यांनी स्पष्ट केले की, दोन-तीन महिन्यांपासून चकरा मारूनही दाखले मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचे न भरून येणारे शैक्षणिक नुकसान होत आहे. भाऊसाहेब वाघ यांनी परीक्षा फॉर्म रखडल्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत तात्काळ दाखले वितरणाची मागणी केली. तर युवा नेते अनिल ताके-पाटील यांनी इशारा दिला की, नगरपंचायतीने या संवेदनशील विषयाची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.
या आंदोलनाला विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शवला. शिवसेनेचे (Newasa News) जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, अहिल्यानगर जिल्हा मराठा पतसंस्थेचे संचालक संभाजीराव मते पाटील, रावसाहेब घुमरे, माजी नगरसेवक अल्ताफ पठाण, रणजित सोनवणे, इम्रान दारूवाले, ॲड. काका गायके, काँग्रेसचे संभाजीराव माळवदे, महिला आघाडीच्या शोभाताई पातारे, अभिजित मापारी, राजेंद्र पोतदार, अतुल कुऱ्हाडे, इम्रान पटेल, शिवसेनेचे शहरप्रमुख बंडू शिंदे, अमृत फिरोदिया, राजेंद्र घोरपडे तसेच नेवासे वकील संघाचे पदाधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पालकांच्या लढ्याला बळ दिले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी चाललेला हा खेळ नगरपंचायत कधी थांबवणार, याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.






