Newasa News : फादर प्रकाश राऊत यांना मानाचा ‘राज्यस्तरीय इच्छापूर्ती गौरव पुरस्कार’ प्रदान; शिर्डीत पार पडला दिमाखदार सोहळा
फादर राऊत यांनी (Newasa News) तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

Newasa News : धार्मिक सलोखा आणि प्रत्यक्ष समाजसेवेचा आदर्श घालून देत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आयुष्य वेचणाऱ्या नेवासे (Newasa News) येथील ज्ञानमाऊली चर्चचे निर्माते व ख्रिस्ती धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांना यंदाचा मानाचा ‘राज्यस्तरीय इच्छापूर्ती गौरव पुरस्कार’ शिर्डी येथे मोठ्या दिमाखात प्रदान करण्यात आला. देवळाली प्रवरा येथील प्रसिद्ध इच्छापूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा गौरव करण्यात आला आहे.
शिर्डी येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात प्रतिष्ठानचे (Newasa News) अध्यक्ष ह.भ.प. संपत जाधव, उपाध्यक्ष गणेश भांड, दत्ता पाटील गागरे आणि सचिव तथा राज्यस्तरीय पुरस्कार प्रमुख गोपाल शिंदे यांच्या हस्ते फादर प्रकाश राऊत यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
फादर प्रकाश राऊत यांनी नेवासे येथे स्थापन केलेले ‘ज्ञानमाऊली चर्च’ हे देशभरात राष्ट्रीय ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाचे एक अनोखे प्रतीक ठरले आहे. या चर्चच्या उद्घाटनावेळी (Newasa News) वाणीभूषण महंत उद्धव महाराज मंडलिक, मौलाना हाफीज सिद्दीकी, फादर अँड्र्यू जाधव यांच्यासह शीख, जैन आणि बौद्ध धर्मगुरू एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या पावन कर्मभूमीत सर्व धर्मांच्या प्रमुखांना एकत्र आणून त्यांनी सामाजिक सलोख्याचा एक ऐतिहासिक संदेश दिला होता.
केवळ धार्मिक कार्यात न थांबता फादर राऊत यांनी (Newasa News) तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. ग्रामीण भागात जिथे पाण्याची तीव्र टंचाई होती, तिथे स्वखर्चाने कूपनलिका (बोअरवेल) आणि सौरऊर्जेवर चालणारे पंप बसवून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावला.
तसेच कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या काळात स्वतःच्या जिवाची पर्वा न करता अनेक गरजू कुटुंबांना घरोघरी जाऊन किराणा व जीवनावश्यक शिधा वाटप करत मोठा सामाजिक आधार दिला.
त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल जर्मनी येथील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेविका डॉ. पेत्रा कार्कविल यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, सर्वधर्मीय संत-महंत, मौलाना आणि ख्रिस्ती धर्मगुरूंनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.






