School News : ‘पटावर 21, शाळेत फक्त 1!’; 100 टक्के अनुदानित शाळेची धक्कादायक अवस्था, दोन वर्षांपासून परिस्थिती जैसे थे
School News : बुलढाण्यातील निमगाव गुरु येथील स्व. भास्करराव शिंगणे विद्यालयात पटावर 21 विद्यार्थी, मात्र प्रत्यक्षात एकच विद्यार्थी हजर. सहा शिक्षकांचे समायोजन.

School News : शासनाकडून शंभर टक्के अनुदान मिळणाऱ्या शाळेत प्रत्यक्षात केवळ एकच विद्यार्थी उपस्थित असल्याची धक्कादायक बाब सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव गुरु येथे समोर आली आहे. स्व. भास्करराव शिंगणे विद्यालयाच्या पटावर 21 विद्यार्थी असल्याचे सांगितले जात असले, तरी शाळेची प्रत्यक्ष पाहणी केली असता फक्त एक विद्यार्थी हजर असल्याचे आढळून आले.
उर्वरित विद्यार्थी शेतातील कामासाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या या शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि शिक्षणाची स्थिती याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या शाळेत पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग आहेत. मात्र, विद्यार्थी संख्या सातत्याने कमी होत असल्याने शाळेतील सहा शिक्षकांचे इतर ठिकाणी समायोजन करण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी अनिल आकाल यांनी दिली. सध्या शाळेत एक मुख्याध्यापक आणि एक शिपाई कार्यरत आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून शाळेची अशीच परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. शाळेतील केवळ दोन वर्गखोल्या सुरू असून, इतर वर्गखोल्यांना कायमचे कुलूप असल्याचे दिसून आले. त्यामुळे शंभर टक्के अनुदानित असलेल्या या शाळेच्या कारभारावर आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.





