Newasa Nagar Panchayat: नेवासा नगरपंचायतीकडून शहरात आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा होत असताना, गेल्या सात-आठ महिन्यांत पाणीपुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीसाठी सुमारे 40 लाख रुपये खर्च केल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अवघ्या 30 ते 35 दिवसांच्या पाणीपुरवठ्यासाठी एवढा मोठा खर्च दाखवण्यात आल्याने या प्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. सप्टेंबर 2025 मध्ये मुख्याधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत सुमारे 195 दिवसांचा कालावधी झाला आहे. या काळात सहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा झाल्याने प्रत्यक्षात शहराला केवळ 30 ते 32 दिवसच पाणी मिळाल्याचे गणित मांडले जात आहे. मात्र, या मर्यादित पुरवठ्यासाठी पाईपलाईन व मोटार दुरुस्तीच्या नावाखाली तब्बल 40 लाखांची बिले काढण्यात आल्याचा आरोप आहे. नगरपंचायतीने विविध तारखांना केलेल्या खर्चात त्रिमूर्ती इलेक्ट्रिक आणि विशाल एजन्सी यांसारख्या पुरवठादारांना वारंवार देयके देण्यात आल्याचे दिसते. सप्टेंबर 2025 पासून मार्च 2026 पर्यंत 50 हजारांपासून ते 12 लाखांपर्यंतच्या बिलांचा समावेश असून, विशेषतः 25 फेब्रुवारी 2026 रोजी पाईपलाईनसाठी 12 लाख 38 हजार रुपयांचा मोठा खर्च दाखवण्यात आला आहे. या खर्चाचा तपशील सामाजिक कार्यकर्ते तथा विधिज्ञ संजय सुखधान यांनी सोशल मीडियावर मांडल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. “आठवड्यातून एकदा पाणी मिळत असताना एवढा खर्च कसा?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेकजण या आकडेवारीची पडताळणी करून नगरपंचायतीच्या कारभारावर टीका करत आहेत. दरम्यान, या प्रकरणाबाबत मुख्याधिकारी निखिल फराटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सोशल मीडियावर फिरणारी आकडेवारी पूर्णपणे अचूक आहे का, हे सांगता येत नाही. प्रत्यक्ष खर्च, पाणीपुरवठ्याचे दिवस आणि दुरुस्तीची कामे यांचा सविस्तर तपास करावा लागेल. भविष्यात पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अधिक दक्षता घेतली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आकडेवारीबाबत संभ्रम सोशल मीडियावर प्रसारित झालेली खर्चाची आकडेवारी आणि प्रत्यक्षात झालेला खर्च यामध्ये तफावत असण्याची शक्यता आहे. तसेच सात महिन्यांत नेमके किती दिवस पाणीपुरवठा झाला, याचाही अचूक तपशील अद्याप स्पष्ट नसल्याने संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त होत आहे.