Dehugaon : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण येऊ न देता देहूगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या आधुनिकीकरणाच्या कामांना गती देण्यात आली आहे. सध्या केंद्रातील टाकी दुरुस्ती आणि सुधारणा कामे युद्धपातळीवर सुरू असून, पाणी अधिक स्वच्छ व सुरक्षित करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बदल केले जात आहेत. या कामाअंतर्गत जलशुद्धीकरण टाकीचे संपूर्ण आधुनिकीकरण करण्यात येत आहे. टाकीतील जुनी फिल्टर वाळू पूर्णपणे काढून टाकून टाकीची सखोल स्वच्छता करण्यात आली आहे. त्यानंतर टाकीला फूड ग्रेड (एपॉक्सी) रंग देण्यात आला असून ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या रंगामुळे पाण्याची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते आणि टाकीच्या आतील पृष्ठभागाचे संरक्षणही होते. सध्या शुद्धीकरण यंत्रणेतील एक बेड पूर्णपणे तयार झाला असून उर्वरित आणखी एक बेडचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. दोन्ही बेड कार्यान्वित झाल्यानंतर जलशुद्धीकरण प्रक्रियेला अधिक वेग आणि कार्यक्षमता प्राप्त होणार आहे. यामुळे शहरातील पाणीपुरवठा अधिक शुद्ध, सुरक्षित आणि नियमित होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, जलशुद्धीकरण केंद्रावरील कामे सुरू असतानाही नागरिकांना पाण्याचा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी बंद असलेला १.५ दशलक्ष लिटर क्षमतेचा (१.५ एमएलडी) जलशुद्धीकरण प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला असून, त्याद्वारे परिसरातील पाणीपुरवठा कायम ठेवण्यात येत आहे. कामे सुरू असताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी संबंधित विभागाकडून समन्वयाने कार्यवाही केली जात आहे. पाणीपुरवठा व जलनिसारण समितीचे सभापती सुधीर काळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यावर विशेष भर दिला जात आहे. याबाबत माहिती देताना पाणीपुरवठा अधिकारी धनंजय नाईकवडे यांनी सांगितले की, कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्व प्रक्रिया राबवली जात आहे. जलशुद्धीकरणात वाळूचे महत्त्व गुजरात येथून मागवण्यात आलेली नवीन फिल्टर मीडिया वाळू टाकण्याचे काम सध्या सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानानुसार तयार करण्यात आलेली ही वाळू पाण्यातील सूक्ष्म कण गाळण्यास अधिक प्रभावी ठरणार आहे. त्यामुळे पाण्याचा गढूळपणा कमी होऊन पाणी अधिक स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. कारण या वाळूमुळे पाण्याचा गढूळपणा (टर्बिडिटी) कमी होतो. शिवाय काही प्रमाणात सूक्ष्मजंतू कमी होण्यास मदत होते आणि पाण्याची एकूण गुणवत्ता सुधारते. Construction projects: शहरातील गृहप्रकल्पांभोवती डीपीचा फेरा