New Marathi Serial : आधी देशसेवा, मग प्रेमाचा गुलाबी प्रवास.! साताऱ्याच्या मातीत फुलणार नवी कोरी ‘लव्हस्टोरी’
टीझरमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने त्याला एक वेगळं दृश्यात्मक रूप मिळालं आहे. त्यामुळे ही मालिका नेमकी कोणती नवी प्रेमकहाणी उलगडणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

New Marathi Serial : मराठी मालिकांच्या विश्वात प्रेमकथांची कमी नाही; मात्र प्रेमाच्या धाग्याला देशभक्तीची जोड देणारी कथा प्रेक्षकांसमोर आली, तर उत्सुकता वाढणारच. एकीकडे मनात प्रेमाची ओढ आणि दुसरीकडे मातृभूमीसाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ! अशा दोन भावनांचा अनोखा संगम आता छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
कलर्स मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी ‘लागलिया ओढ जिवा’ ही नवी मालिका घेऊन येत आहे. मालिकेचा पहिला टीझर प्रदर्शित झाला असून, त्यातील साताऱ्याची रांगडी बोली, गावाकडचा बाज आणि देशसेवेची स्वप्नं यामुळे या मालिकेची चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, टीझरमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याने त्याला एक वेगळं दृश्यात्मक रूप मिळालं आहे. त्यामुळे ही मालिका नेमकी कोणती नवी प्रेमकहाणी उलगडणार, याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
मालिकेच्या टीझरमधील संवादाने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. “साताऱ्याची हवाच भारी, मातीत भिनलीया पिरतीची खुमारी… पण दोघांचं बी सपान एकच हुतं, आधी देशासाठी संग झटायचं अन मंग पिरमात रंगायचं!” या संवादातून मालिकेच्या कथेचा अंदाज येतो. साताऱ्याच्या खास बोलीतून व्यक्त झालेली प्रेमाची भावना आणि देशासाठी काहीतरी करण्याची धडपड यामुळे टीझरला एक वेगळीच रंगत आली आहे.
वाहिनीकडूनही टीझरसोबत हटके कॅप्शन देण्यात आलं आहे. “साताऱ्याच्या मातीत देशप्रेमाचं सपान पुरं व्हणार आन् प्रेम फुलणार! येतेय एक नवी ‘खट’ लवस्टोरी, जी नुसतं ‘याड’ नाय ‘ओढ’ बी लावणार…” अशा शब्दांत मालिकेची झलक प्रेक्षकांसमोर आणण्यात आली आहे.
मुख्य कलाकार कोण? गुपित अद्याप कायम!
या मालिकेच्या टीझरमध्ये तरुण जोडप्याची झलक पाहायला मिळत असली, तरी मुख्य कलाकारांचे चेहरे अद्याप समोर आलेले नाहीत. टीझरच्या शेवटी ही जोडी एनसीसी कॅडेट्सच्या गणवेशात दिसते. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखांचा देशसेवा आणि शिस्तीशी असलेला संबंध अधोरेखित होतो.
या नव्या मालिकेत कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार, त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री कशी असेल आणि त्यांच्या प्रेमप्रवासात कोणती आव्हानं येणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.





