नवीन आयकर विधेयकाला आज कॅबिनेटची मंजूरी मिळण्याची शक्यता, पुढील आठवड्यात संसदेत मांडले जाणार बिल

New Income Tax bill : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज (7 फेब्रुवारी) रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत नव्या आयकर विधेयकाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या विधेयकाबाबतची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या भाषणात आधीच दिली होती. याशिवाय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत इतरही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.
वित्त सचिवांनी या विधेयकाबाबत माहिती देताना सांगितले की, नवीन आयकर विधेयक सहा दशकं जुन्या आयकर अधिनियम, 1961 च्या जागी आणण्यात येणार आहे. या नवीन आयकर विधेयकात कोणताही नवीन कर किंवा कोणतेही अनावश्यक आर्थिक गोष्टींचा समावेश नसेल. या विधेयकात 2025-26 च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आयकर दर, कर प्रणाली आणि स्रोतावरील कर कपात (TDS) संबंधित सुधारणा समाविष्ट केल्या जातील.
तसेच, कोणतीही अस्थिरता निर्माण होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत. धोरणात फार मोठा बदल केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन आयकर विधेयकात काय असेल?
आयकर दर, कर प्रणाली आणि स्रोतावरील कर कपात (TDS) संबंधित सुधारणांचा समावेश असेल. हे आयकर अधिनियम, 1961 ची जागा घेईल. तसेच, करदात्यांना समजण्यास अधिक सोपे जावे, यासाठी हे कायदा अधिक सोप्या भाषेत मांडला जाणार आहे. नवीन कायदा संक्षिप्त ठेवण्यात येणार असून, यामुळे तर सामान्य नागरिकांनाही यातील महत्त्वाच्याबाबी समजण्यास मदत होईल.
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणातच याबाबत घोषणा केली होती. तसेच, पुढील आठवड्यात हे विधेयक मांडले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. अर्थसंकल्पात 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा करत सर्वसामान्यांना देखील मोठा दिलासा देण्यात आला होता.





