पुणे | महापालिकेत नवा गडी नवे राज्य

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – महापालिकेच्या आरोग्य विभागात अधिकाऱ्यांमध्ये खांदेपालट करण्यात आली असून, अधिकाऱ्यांची एकाच विभागातील मक्तेदारी संपविण्यात आली आहे. नवा गडी नवे राज्य या उक्तीप्रमाणे महापालिका आयुक्त आणि नवनियुक्त आरोग्यप्रमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.
आरोग्य विभागातील सहायक आरोग्य अधिकाऱ्यांकडे अनेक विभागांच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यातील काही जणांकडे वर्षानुवर्षे तेच विभाग होते.
त्यामुळे त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांचीही नियुक्तीही वर्षानुवर्षे त्याच विभागात होती. त्यामुळे साहजिकच मक्तेदारी निर्माण झाल्याने ही खांदेपालट करण्यात आली आहे.
नव्या जबाबदारीनुसार सहायक आरोग्य अधिकारी मनीषा नाईक यांच्याकडील शहरी गरीब योजना, विकेंद्रीत परवाना, नर्सिंग होम रजिस्ट्रेशन, खासगी दवाखाना नियमन आणि नियंत्रण आदी विभाग काढून त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम अंमलबजावणी, जन्म-मुत्यू नोंदणी विभाग आणि परिमंडळ दोन सनियंत्रण आणि पर्यवेक्षण अधिकारी ही जबाबदारी दिली आहे.
उप आरोग्य अधिकारी कल्पना बळीवंत यांच्याकडे आता मेडिकल युनिट आणि आरोग्य विभागाकडील सामान्य प्रशासन, पीसीपीएनडीटी आणि एमटीपी अॅक्ट कामकाज, मेडिकल कॉलेज व्यवस्थापन, १ ते ३ लाखांपर्यंतच्या वैद्यकीय बिलांची देयके मान्यतेची जबाबदारी असेल.
डॉ. वैशाली जाधव यांच्याकडे साथरोग नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा नियोजन समितीमार्फत करावयाची कामे, महापौर निधी, राष्ट्रीय असंसर्गजन्य आजार कार्यक्रम, परिमंडळ क्रमांक ४ सनियंत्रण आणि पर्यवेक्षण अधिकारी अशी जबाबदारी दिली आहे.
डॉ. संजीव वावरेंना औषध भांडार, रुग्णालयांची सुधारणा आणि आधुनिकीकरण, आरोग्य प्रकल्प, अंशदायी वैद्यकीय सहायक योजना, शहरी गरीब योजना, परिमंडळ क्रमांक १ सनियंत्रण आणि पर्यवेक्षण अधिकारी अशी जबाबदारी दिली आहे.
डॉ. सूर्यकांत देवकर यांना जैववैद्यकीय कचरा विल्हेवाट, नर्सिंग होम रजिस्ट्रेशन, विकेंद्रीत परवाना विभाग, एडस्, परिमंडळ क्रमांक ३ सनियंत्रण आणि पर्यवेक्षण अधिकारी ही जबाबदारी, तर डॉ. राजेश दिघे यांच्याकडे कीटक प्रतिबंधक विभाग,
सीएसआर, स्मशानभूमी, दफनभूमीबाबत संपूर्ण कामकाज, बोगस डॉक्टर शोधमोहीम, राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम, परिमंडळ क्रमांक ५ सनियंत्रण आणि पर्यवेक्षण अधिकारी ही जबाबदारी दिली आहे.
मनमानी आणि तक्रारी…
काही अधिकारी तर विभागप्रमुख म्हणून बिलांवर स्वतःच सह्या करत असल्याची बाब उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे तर रजेवर जाताना सहायक आरोग्य अधिकारी आपल्याकडील पदभार दुसऱ्याकडे न सोपवता स्वतःकडेच ठेवत असल्याचीही उदाहरणे समोर आली होती. काही अधिकार्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी महापालिकेच्या अतिवरिष्ठ अधिकार्यांकडे आल्या होत्या.





