बंगळूर – कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपचे उमेदवार एम.के.प्रणेश यांची शुक्रवारी विधान परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. जेडीएसच्या पाठिंब्यामुळे ते शक्य झाले. भाजप आणि जेडीएसच्या वाढत्या जवळिकीने त्या राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयास येण्याची चिन्हे बळावली आहेत. कर्नाटकात काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेस-जेडीएस आघाडीची सत्ता होती. मात्र, बंडखोरीमुळे त्या आघाडीचे सरकार कोसळले. त्यातून भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर कॉंग्रेस आणि जेडीएसमधील दुरावा वाढत गेला. सत्ताबदलानंतरही विधान परिषदेचे उपाध्यक्षपद जेडीएसचे एस.एल.धर्मेगौडा यांच्याकडे होते. मात्र, त्यांनी मागील महिन्यात कथितपणे आत्महत्या केली. त्यांच्या निधनामुळे निवडणूक घ्यावी लागली. त्या निवडणुकीत भाजपच्या प्रणेश यांनी कॉंग्रेसचे उमेदवार के.सी.कोंडय्या यांचा पराभव केला. कर्नाटक विधान परिषदेचे एकूण संख्याबळ 75 आहे. सत्तारूढ भाजपचे सर्वांधिक 31 सदस्य आहेत. कॉंग्रेसचे 29, तर जेडीएसचे 13 सदस्य आहेत. जेडीएस मदतीला धावल्याने भाजपला उपाध्यक्षपद मिळवणे शक्य झाले. आता त्याची परतफेड म्हणून भाजपकडून जेडीएसला विधान परिषदेचे अध्यक्षपद दिले जाणार असल्याचे समजते. ते पद सध्या कॉंग्रेसचे के.प्रतापचंद्र शेट्टी भुषवत आहेत. त्यांच्याविरोधात भाजपने याआधीच अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्याला पाठिंबा देण्याची तयारी जेडीएसने दर्शवली आहे. त्यामुळे शेट्टी यांना राजीनामा देणे भाग पडणार आहे.