US-China : अमेरिका-चीनमध्ये नवीन वाद उद्भवला; लंडनमध्ये ‘या’ आठवड्यात होणार वाटाघाटी

US-China – अमेरिका आणि चीनमध्ये आयात शुल्काच्या मुद्द्यावर या आठवड्यात लंडनमध्ये चर्चा होणार आहे. परंतू त्यापुर्वीच दोन्ही देशांमध्ये नवीन वाद उद्भवला आहे. मुळे ही चर्चा फिसकटण्याची भीती निर्माण झाली आहे.
अमेरिका आणि चीन दोन्ही देशांनी एकमेकांवर लावलेल्या १०० टक्के आयात शुल्काच्या अंमलबजावणीला ९० दिवसांची स्थगिती देण्यावर गेल्या महिन्यात जिनिव्हा येथे एकमत झाले होते.
मात्र तेंव्हापासून दोन्ही देशांमधील नेत्यांनी ॲडव्हान्स सेमिकंडक्टर, आर्टिफिशियल इंटिलिजन्स, कार उत्पादकांसाठी बहुउपयोगी असलेली दुर्मिळ खनिज आणि चिनी विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी व्हिसा आदींबाबत जोरदार शेरेबाजी केली होती.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्यानंतर लंडनमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये सोमवारी चर्चा होईल, असे ट्रम्प म्हणाले होते.
मात्र चीनमध्ये एआय चीपच्या निर्यातीला निर्बंध घातले असतानाही चीनमधील हुआवेई या तंत्रज्ञान कंपनीकडून ॲसेंड एआय चीपचा वापर होण्याने अमेरिकेच्या निर्यात नियंत्रणाचे उल्लंघन होईल, असा दावा अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने केला आहे.
या दाव्यावर चीन सरकार फारसे खूष नाही. चीनने अमेरिकेला त्यांच्या चुकीच्या पद्धती ताबडतोब दुरुस्त करण्याचे आवाहन केले असल्याचे चीनच्या वाणिज्य मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. जिनिव्हामध्ये झालेल्या चर्चेसाठी अमेरिकेचे वाणिज्य मंत्री हॉवर्ड लुटनिक हे उपस्थित नव्हते.
मात्र सोमवारी होणाऱ्या चर्चेसाठी लंडनमध्ये ते दाखल होणार आहेत. चीनच्या निर्यातीला नियंत्रित करण्याच्या मुद्द्यावर चीनची बाजू किमान ऐकून तरी घेतली जाईल, असा निरीक्षकांचा अंदाज आहे.





