मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख, तर जखमींना 2.5 लाख रुपये; नवी दिल्ली रेल्वे स्थानक चेंगराचेंगरी घटनेतील पीडितांना आर्थिक मदत जाहीर

New Delhi Railway Station Stampede | नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये प्रामुख्याने महाकुंभला निघालेल्या भाविकांचा समावेश आहे. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. अचानक गर्दी अनियंत्रित झाल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि 15 वर ही दुर्दैवी घटना घडली.
या चेंगराचेंगरीत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 हून अधिक जण गंभीररित्या जखमी आहेत. आता सरकारकडून या घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.
या घटनेत मृत पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तर गंभीर जखमींना 2.5 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 1 लाख रुपयांची भरपाई देण्यात येणार आहे.
Rs 10 lakh compensation has been announced to the families of the deceased who lost their lives in the New Delhi Railway Station stampede yesterday. Rs 2.5 lakh compensation to the seriously injured and Rs 1 lakh to the minor injured: Indian Railways
— ANI (@ANI) February 16, 2025
याशिवाय, या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी व ही घटना नेमकी कशामुळे घडली याचे कारण शोधण्यासाठी दोन सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
या घटनेबाबत दिल्ली पोलिसांनी निवेदन जारी केले आहे. प्रयागराज एक्सप्रेस प्लॅटफॉर्म 14 वर उभी असताना, प्लॅटफॉर्मवर बरीच गर्दी झाली. स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानीला उशीर झाल्याने आणि या गाड्यांचे प्रवासी देखील प्लॅटफॉर्म क्रमांक 12,13 आणि 14 येथे उपस्थित होते. सीएमआयनुसार रेल्वेने दर तासाला 1500 सामान्य तिकिटे विकली, म्हणून गर्दी अनियंत्रित झाली. प्लॅटफॉर्म क्रमांक 14 आणि प्लॅटफॉर्म क्रमांक 16 जवळ एस्केलेटरजवळ चेंगराचेंगरी झाली असल्याचे सांगितले जाते.
या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनीही ट्विट करत ‘नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीमुळे मी व्यथित झालो आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याप्रती माझी मनापासून सहानुभूती आहे’, असे म्हंटले आहे.





