हेमंत सोरेन यांच्या वयावरून नवा वाद; भाजपने दाखल केली तक्रार

रांची : झारखंडचे मुख्यमंत्री आणि झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांच्या वयावरून वादंग निर्माण झाले आहे. सोरेन यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रातून वयाबाबत चुकीची माहिती दिल्याची तक्रार भाजपने दाखल केली आहे. सोरेन बरहेट मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. भाजपने त्यांच्या विरोधात गमालियल हेम्ब्रम यांना मैदानात उतरवले आहे.
हेम्ब्रम यांनी निवडणूक आयोगाकडे सोरेन यांच्या विरोधात तक्रारी नोंदवली आहे. सोरेन यांनी मागील निवडणुकीवेळी (वर्ष 2019) त्यांचे वय 42 वर्षे असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. आताच्या निवडणुकीसाठी सोरेन यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचे वय 49 वर्षे दर्शवण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीचे वय 5 वर्षांच्या कालावधीत 7 ने कसे काय वाढते, असा सवाल हेम्ब्रम यांनी तक्रारीतून केला आहे.
तसेच, सोरेन यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे. सोरेन यांच्या वयावरून वाद निर्माण झाल्यानंतर झामुमोचा मित्रपक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने भाजपवर टीकास्त्र सोडले. निवडणूक काळात सामान्य माणसाशी संबंधित मुद्द्यांवरून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी भाजप नवनव्या गोष्टी सांगेल, अशी खिल्ली कॉंग्रेसने उडवली. झारखंडमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात १३ आणि २० नोव्हेंबर अशा २ टप्प्यांत मतदान होईल.





