निष्काळजीपणामुळे एक एकर ऊस जळाला; शेजाऱ्याचे ५० हजारांचे नुकसान; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर : शिरूर तालुक्यातील फाकटे येथील शेतात पाचट जाळल्याने शेजाऱ्याच्या एक एकर ऊस पिकास आग लागून सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाळासाहेब धोंडीबा हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे (रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमन पंढरीनाथ काळे (वय ५६, रा. फाकटे, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, फिर्यादी सुमन काळे या २३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आपल्या शेतात (गट नंबर ९२/११) ऊसाला पाणी देत असताना त्यांना शेजारील शेतात धुर दिसल्याने त्या घटनास्थळी गेल्या. तेथे आरोपी बाळासाहेब हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन यांनी त्यांच्या शेतातील उसाचे पाचट जाळले होते. यामुळे फिर्यादीच्या शेतात (गट नंबर ९३/१३) लागलेल्या एक एकर लहान ऊस पिकाला आग लागली. यासोबतच पाण्याची पाइपलाइनही आगीत जळाली.
घटनास्थळी योगेश शिंदे, महादू शिंदे, आणि संदीप हुंडारे हे साक्षीदार उपस्थित होते. फिर्यादीच्या मते, आरोपींना आग लागल्यास शेजारील ऊसाला आणि मालमत्तेला धोका होऊ शकतो याची पूर्ण जाणीव होती, तरीही त्यांनी जाणीवपूर्वक पाचट पेटवून दिले. परिणामी फिर्यादीचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार आगलावे करत आहेत.





