वीज कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला मंचर – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील चोळीचा मळा येथे शुक्रवार, दि. ४ रोजी सायंकाळच्या सुमारास शॉर्टसर्किट होऊन उस पिकाला आग लागून नुकसान झाले. यावेळी शेतकरी, जवळच्या शेतात काम करणारे शेतमजूर व महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. चोळीचा मळा येथील शेतकरी नरहरी रंगनाथ वळसे पाटील यांचे उसाचे पीक असून सायंकाळच्या सुमारास त्यांच्या शेताच्या शेजारी असलेल्या महावितरणच्या डीपीवर तारांचे शॉर्टसर्किट होऊन ऊसाला आग लागली. त्यावेळी तेथील स्थानिक शेतकऱ्यांनी तात्काळ आग विझवण्याचा प्रयत्न करत महावितरणचे निरगुसर विभागाचे शाखा अभियंता नितेश बसारकर आणि महावितरणचे जनमित्र सोमनाथ दिवेकर,निलेश कोळी, विकास बांगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करत घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी शेतात काम करणारे शेतमजूर यांनी ज्या ठिकाणी आग लागली आहे, त्या ठिकाणापासून पुढे जाऊन उसाच्या शेतात काही ऊस तोडून उसांमध्ये अंतर निर्माण केले. आग पुढे गेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागल्याच्या ठिकाणी नरहरी वळसे पाटील व जवळपासच्या अनेक शेतकऱ्यांचे अंदाजे २० ते ५० एकर उसाचे क्षेत्र असल्याने वेळेत आग नियंत्रणात आल्याने इतर शेतकऱ्यांचा ऊस जळण्यापासून वाचला.शेतकरी नरहरी रंगनाथ वळसे पाटील यांच्या दोन ते तीन एकर ऊस जळून गेला आहे. यापूर्वी या ठिकाणी अनेकदा महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याच्या घटना घडल्या असून महावितरणने उपाययोजना करावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.थ्री फेज लाईट नसताना सिंगल फेज कनेक्शन वर काही शेतकऱ्यांनी शेती पंपाचे पाण्याची मोटर सुरू केल्याने शॉर्टसर्किट होऊन ऊसाला आग लागली असून याबाबत घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली असल्याचे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.