पुणे जिल्हा : कुकडी प्रकल्पातील पाणी पेटले

सर्वपक्षीय नेते एकवटले : कालवा समितीच्या निर्णयानुसार पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन
नारायणगाव – जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करून कुकडी कालवा समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार कुकडी कालवा प्रकल्पातून पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी दिला. तसेच सर्व पक्षीय नेत्यांनी रविवारी (दि. 14) जुन्नर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले.
सर्व पक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी आर. बी. रावले, आर. जी. हांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, पोलीस निरीक्षक नारायण पवार, नायब तहसीलदार सचिन मुंढे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी आमदार अतुल बेनके, आशा बुचके, माऊली खंडागळे, संतोष खैरे, अशोक घोलप, मकरंद पाटे, दिलीप खिलारी, देवराम लांडे, रघुनाथ लेंडे, मोहित ढमाले, भाऊ देवाडे, दिलीप गांजाळे, समीर भगत, दत्ता गवारी, सचिन चव्हाण, गुलाब पारखे, अंकुश आमले, बाबा परदेशी, बन्सी चतुर, पापाशेठ खोत, प्रकाश ताजणे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार अतुल बेनके म्हणाले की, कुकडी कालवा समितीच्या बैठकीत अहमदनगर, जामखेड, कर्जतचे आमदार राम शिंदे, रोहित पवार यांनी वस्तुस्थिती विचारात न घेता ज्यादा पाण्याची अतिरिक्त मागणी करुन “उन्हाळी आवर्तन-2′ लगेचच सोडण्यात यावे अशी मागणी केली; परंतु त्यासाठी पिंपळगाव जोगा धरणातील मृत साठ्यातून अतिरिक्त 3 टीएमसी पाणी घ्यावे लागेल, असे जलसंपदा विभागाचे अधिकाऱ्यांनी सांगितले; परंतु बेनके यांनी धरणातून दोन टीएमसी पेक्षा जास्त पाणी घेण्यास विरोध केला.
मृतसाठ्यातील पाणी घेणे हा प्रकल्प अहवालाचा भाग नसल्याचे स्पष्ट केले. पावसाळा कमी झाल्यास वडज, डिंभे, माणिकडोह व येडगाव धरणातील 15 जुलै पर्यंत पिण्यासाठी पाणीसाठा शिल्लक राहील. जुन्नर तालुक्याचा पाणीसाठा राखीव ठेवून 30 मे पासून पाणी सोडण्यास आमची हरकत नसल्याचे स्पष्ट केले.
कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अशोक घोलप म्हणाले की, नेहमीच आपल्या हक्काचे पाणी खालच्या तालुक्यांना सोडले जाते. धरणातील पाण्याचा सर्व्हे करताना जून, जुलै महिन्यात न करता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये करून धरणात शंभर टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले जाते; परंतु वास्तव वेगळे असते, असे त्यांनी नमूद केले.मनसेचे दिलीप खिलारी म्हणाले की, शिवजन्मभूमीत पाच ते सहा धरणे आहे असे आपण अभिमानाने सांगतो, परंतु आपल्याला पाणी मिळणार नसेल तर त्याचा उपयोग काय. जनतेच्या प्रश्नासाठी एकत्र येऊन जाणारे पाणी थांबवले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.
कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या धरणांचा आजचा उपयुक्त पाणीसाठा 6.125 टीएमसी म्हणजेच 20.64 टक्के इतका आहे. यातील येडगाव (0.888 टीएमसी), माणिक डोह (1.065 टीएमसी), वडज (0.213 टीएमसी), पिंपळगावजोगे (1.115), डिंभे (2.843 टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे.
राजकीय जोडे बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरलो आहोत. जुन्नर तालुक्यात आजही धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेले नाही. जमिनी आम्ही दिलेल्या असूनही आम्हाला पाणी मिळणार नसेल तर ते सहन केले जाणार नाही. अनेक आदिवासी गावात टॅंकर सुरू आहे. दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आमदार अतुल बेनके यांचे हात बळकट करायला हवे. अन्यथा तालुक्यातील आमदारांना गृहीत धरून पाणी सोडण्याचे निर्णय घेतले जात आहे.
– आशा बुचके, भाजप
पाणी सोडण्यास आमचा विरोध नाही; परंतु मृत साठ्यातून पाणी काढणार असतील तर आदिवासी गावांची स्थिती भयानक होईल. वडज, माणिकडोह धरणावर अनेक गावे अवलंबून आहेत.
– माऊली खंडागळे, तालुकाप्रमुख, ठाकरे गट
जुन्नर तालुक्याची पिण्याच्या पाण्याची गरज भागली पाहिजे. हक्काचे पाणी मिळत नसेल तर पाणी सोडू देऊ नका. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या कानावर घाला.
– संजय काळे, राष्ट्रवादी
धरण आमच्या उशाला अन् कोरड घशाला अशी आदिवासींची अवस्था झाली आहे. माणिकडोह धरणाचे पाणी सोडल्यास जनावरे तडफडून मरतील. कोणी पाणी सोडायला आले तर जीवाची पर्वा न करता मावळातील माणसं, जनावरे, बायका, पोरे, कार्यकर्ते, सरपंच, धरणा जवळ येऊन बसू, आंदोलन करू.आम्हाला धरणात बुडवले तरी चालेल; परंतु बिगर पाण्याने मरायचेच असेल तर आंदोलन करून मरू.
– देवराम लांडे, आदिवासी नेते





