NEET paper leak: नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट; लातूरच्या बालरोगतज्ज्ञासह तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
NEET paper leak: NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणातील तीन आरोपींना दिल्लीतील विशेष न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

NEET paper leak: NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणातील तीन आरोपींना दिल्लीतील विशेष न्यायालयाने सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या (NTA) पॅनेलवरील भौतिकशास्त्र विषयाच्या अनुवादक मनीषा संजय हवालदार, लातूरमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे आणि भौतिकशास्त्र शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यांचा यात समावेश आहे.
विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) मागणीला मान्यता देत तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.
सीबीआयने न्यायालयात सांगितले की, मनीषा हवालदार यांनी इतर आरोपींसोबत संगनमत करून कोणतीही अधिकृत परवानगी नसताना NEET-UG परीक्षेचा प्रश्नसंच पैशांच्या मोबदल्यात जतन करून वितरित केला. (NEET paper leak)
तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, लातूरमधील ‘रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस’चे संचालक शिवराज रघुनाथ मोटेगावणकर यांच्या मुलासह तीन विद्यार्थ्यांना NEET प्रश्नपत्रिका तयार करणारे पी. व्ही. कुलकर्णी यांच्याकडून रसायनशास्त्र विषयाचे प्रश्न मिळवून देण्यात डॉ. मनोज शिरुरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या प्रकरणात सीबीआयने यापूर्वीच मोटेगावणकर आणि कथित सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी यांना अटक केली आहे.
पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकादमी (APMA) या कोचिंग संस्थेत भौतिकशास्त्र शिक्षक असलेले तेजस शाह यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सीबीआयच्या माहितीनुसार, शाह यांनी मनीषा हवालदार यांच्याकडून फुटलेले भौतिकशास्त्र विषयाचे प्रश्न प्राप्त केले होते.
या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयने १३ जणांना अटक केली आहे. ३ मे रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेच्या पेपरफुटीच्या आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने १२ मे रोजी परीक्षा रद्द केली होती. आता या परीक्षेची फेरपरीक्षा २१ जून रोजी घेण्यात येणार आहे.





